नांदेडमध्ये जाहिरात, होर्डिंग्जसाठी आता अधिकचे पैसे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2018 01:07 AM2018-07-19T01:07:03+5:302018-07-19T01:07:25+5:30
महानगरपालिकेने विनापरवाना होर्डिंग्ज, बॅनर लावण्यावर बंदी घातली आहे. परिणामी शहराचे विद्रूपीकरण करणे कमी झाले आहे. आता खाजगी जागा तसेच इमारतीवर कायमस्वरूपी लावण्यात येणाऱ्या जाहिराती तसेच होर्डिंग्जही मनपाच्या रडारवर आल्या असून गुरुवारी होणा-या मनपाच्या सर्वसाधारण सभेत या होर्डिंग्जच्या कर दरामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : महानगरपालिकेने विनापरवाना होर्डिंग्ज, बॅनर लावण्यावर बंदी घातली आहे. परिणामी शहराचे विद्रूपीकरण करणे कमी झाले आहे. आता खाजगी जागा तसेच इमारतीवर कायमस्वरूपी लावण्यात येणाऱ्या जाहिराती तसेच होर्डिंग्जही मनपाच्या रडारवर आल्या असून गुरुवारी होणा-या मनपाच्या सर्वसाधारण सभेत या होर्डिंग्जच्या कर दरामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.
महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा १९ जुलै रोजी सकाळी ११ वाजता मुख्य प्रशासकीय इमारतीतील चौथ्या मजल्यावर असलेल्या कै. शंकरराव चव्हाण सभागृहात होत आहे. या सभेत मनपा मालकीच्या जागेवरील तसेच खाजगी जागेवर, इमारतीवर कायमस्वरूपी लावण्यात येणा-या जाहिराती तसेच होर्डिंग्ज करात दरवाढ करण्याचा प्रस्ताव आहे. याबरोबरच या सभेत तरोडा भागातील अंतर्गत मलनि:सारण योजनेच्या वाढीव कामास मान्यता देण्याचा प्रस्ताव आहे. मनपा हद्दीतील एएमआरसीअंतर्गत कामे कार्यारंभ आदेश दिल्यानंतरही काही कंत्राटदार सुरू करण्यास असमर्थता व्यक्त करीत आहेत. सदर कामे त्यांना मंजूर केलेल्या दराने इतर नोंदणीकृत कंत्राटदारांकडून करण्यास मंजुरी देण्याबाबतचा प्रस्तावही या सभेत येणार आहे. याबरोबरच मनपा हद्दीतील मालमत्ता कराबाबत फेर सर्वेक्षण व फेरमूल्यांकन सुरू आहे. या विषयावर चर्चा अपेक्षित असून बापूराव गजभारे हे आ. प्रा. जोगेंद्र कवाडे यांना अमृतमहोत्सवी वर्षानिमित्ताने मानपत्र देवून गौरविण्याचा ठराव मांडणार आहेत. तर बेबीताई गुपिले यांनी प्रभाग क्र. १९, २० संभाजी चौक ते कोचिंग क्लासेसपर्यंतच्या मजबुतीकरण व दलितवस्ती सुधार योजनेअंतर्गत प्रभाग क्र. २० मधील अनेक कामांसह इतर अंतर्गत २१ कामांचा समावेश असलेली कामे मान्यता देण्याबाबतचा प्रस्ताव ठेवला आहे. या विषयालाही मंजुरी मिळण्याची अपेक्षा आहे.