१२ वर्षानंतर बाळ झालं होतं, डॉक्टरांनी जीव घेतला; सुप्रिया सुळेंसमोर मातेने फोडला हंबरडा
By श्रीनिवास भोसले | Published: October 5, 2023 01:51 PM2023-10-05T13:51:54+5:302023-10-05T13:52:13+5:30
नांदेडच्या शासकीय रुग्णालयात सोमवारपासून २५ पेक्षा जास्त नवजात बालकांचा जीव गेला आहे.
नांदेड: हातपाय वाकडे झाले...बाळाला झटके येत होते. बघा बघा म्हणून विनवण्या केल्या... तरी बघत नव्हते... या डॉक्टरांनी माझ्या बाळाचा जीव घेतला म्हणत पैठणच्या एका मातेने हंबरडा फोडला. आक्रोश करणाऱ्या मातेला शांत व्हा, म्हणून धीर देणाऱ्या खासदार सुप्रिया सुळे यांना मी कसं शांत राहू... मला १२ वर्षानंतर बाळ झालं हाेतं. त्याचाही जीव घेतला हो...या महिलेच्या आक्रोशाने उपस्थितांचे मन हेलावून टाकले.
नांदेड येथील शासकीय रूग्णालयातील नवजात बालकांच्या मृत्यूचे सत्र थांबेना. सोमवारपासून २५ पेक्षा जास्त नवजात बालकांचा जीव गेला आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण येथील एका महिलेचे प्रसुती झाल्यानंतर तिच्या बाळाला नांदेडच्या शासकीय रूग्णालयाच्या नवजात बालक अतिदक्षता विभागात भरती करण्यात आले. परंतु, गुरूवारी त्याचा झटके येवून मृत्यू झाला. तब्बल बारा वर्षानंतर जी स्त्री आई झाली, तिचे मातृत्व अवघ्या काही क्षणात हिरावल्याने होणाऱ्या वेदना तीलाच माहित. नांदेड येथील रूग्णालयातील मृत्यू सत्र कधी थांबणार, असा संतप्त सवाल नातेवाईकांतून उपस्थित केला जात आहे.