कोरोना रुग्णाच्या मृत्यूनंतर हदगावच्या उपजिल्हा रुग्णालयात मयताच्या मुलाने केली तोडफोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 06:45 PM2021-04-21T18:45:42+5:302021-04-21T18:47:21+5:30
आडा येथील शेतकरी शंकरराव सूर्यवंशी यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यामुळे त्यांना उपचारासाठी हदगावच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले.
नांदेड : हदगाव येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये कोरोनाबाधित उपचार घेणाऱ्या आडा येथील शेतकरी शंकरराव चंद्रवंशी यांचा सोमवारी मृत्यू होताच त्यांच्या मुलाने रुग्णालयामध्ये साहित्याची तोडफोड करीत डॉक्टरांना शिवीगाळ केली. मात्र, आरोग्य कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेताच अखेर याप्रकरणी हदगाव पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे.
आडा येथील शेतकरी शंकरराव सूर्यवंशी यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यामुळे त्यांना उपचारासाठी हदगावच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. मात्र, त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना पुढील उपचारासाठी त्यांना हलविण्यात यावे, अशा सूचना वैद्यकीय अधिकारी धारबा नाईक यांनी सदाशिव चंद्रवंशी या त्यांच्या मुलाला दिली होती. मात्र, सोमवारी रात्री शेतकरी शंकरराव चंद्रवंशी यांचा मृत्यू झाला. हा राग मनात धरून त्यांचा मुलगा सदाशिव चंद्रवंशी व अन्य दोघांनी रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी धारबा नाईक यांना शिवीगाळ केली. त्यानंतर त्यांनी रुग्णालयातील साहित्याची तोडफोड केली. या घटनेनंतर आरोग्य कर्मचाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत आंदोलनाचा इशारा दिला होता. अखेर वैद्यकीय अधिकारी नाईक यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हदगाव पोलीस ठाण्यात सोमवारी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.