सासऱ्याला हरवून पत्नी थेट सरपंचपदी, पण पती सदस्यत्वाच्या निवडणुकीत मामीकडून पराभूत
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2022 07:06 PM2022-12-20T19:06:11+5:302022-12-20T19:07:26+5:30
कंधार तालुक्यातील इमामवाडीत ग्रामपंचायत येथे लक्षवेधी लढत; सदस्यपदासाठी पतीचा मात्र मामी नंदा गायकवाड यांनी अवघ्या एका मताने पराभव केला.
कंधार (नांदेड): तालुक्यातील १२ ग्रामपंचायतीची आज मतमोजणी तहसील कार्यालय येथे पार पडली. अनेक गावात सत्ता परिवर्तन झाल्याने अनेकांचा हिरमोड झाला. तालुक्याचे लक्ष लागलेल्या इमामवाडीत सासूबाईंच्या भावाचा पराभव करून थेट सरपंचपदी शाहुताई कांबळे विजयी झाल्या. मात्र पतीचा ग्रामपंचायत सदस्य जागेवर एका मताने मामीकडून धक्कादायक पराभव झाला.
तालुक्यातील १६ पैकी ४ ग्रामपंचायती बिनविरोध पार पडली. १२ ग्रामपंचायतीत गाव पुढाऱ्यानी निवडणूक प्रतिष्ठेची केली होती.त्या गावातील निवडणुकीची मतमोजणी तहसील कार्यालयात दि.२० डिसेंबर रोजी पार पडली.गाव लहान असले तरी सहा सदस्य बिनविरोध काढण्यात आले.परंतु सरपंचपद व एका सदस्यासाठी सख्ये नातेवाईक निवडणुकी निमित्ताने आमनेसामने आले होते.त्यामुळे या लढतीकडे तालुक्याचे लक्ष लागले होते.शाहुताई सुनील कांबळे यांनी सासुबाईच्या भावाचा पराभव केला.सरपंचपद अनुसूचित जातीसाठी आरक्षित होते. सदस्यपदासाठी पतीचा मात्र मामी नंदा गायकवाड यांनी अवघ्या एका मताने पराभव केला.
मानसपूरीत दिग्ज पुढारी एकीकडे असताना सुद्धा सत्ता परिवर्तन होऊ शकले नाही.सरपंच म्हणून मेघा डुकरे या मोठ्या फरकाच्या मताने विजयी झाल्या .या गावातच सदस्य पदासाठी प्रभाग दोन मध्ये सख्या जाऊबाई आमनेसामने आल्या होत्या. परंतु चावूत्राबाई सुर्यवंशी यांनी आपल्या जाऊबाईचा पराभव केला.प्रभाग एक मध्ये सर्वसाधारण स्त्री जागेवर रोहिणी चिवळे एका मताच्या फरकाने विजयी झाल्या.
ईश्वर चिठ्ठीने विजय
चौकी धर्मापूरी येथे सरपंचपद सर्वसाधारण स्त्रीसाठी आरक्षित होते.अनुजा इंगळे या थेट सरपंचपदी निवडून आल्या.प्रभाग दोन मध्ये अत्यंत काटा लढत सदस्यासाठी झाली.सर्वसाधारण जागेसाठी परमेश्वर गिते व बालाजी मेकलवाड यांना समान ८२ मते प्रत्येकी पडली.त्यात ईश्वर चिठ्ठीने परमेश्वर गिते विजयी झाले. सर्वसाधारण स्त्री जागेसाठी जमुनाबाई डुबुकवाड या एका मताच्या फरकाने विजयी झाल्या.
नवरंगपूरा गावात सत्ता परिवर्तन झाले. सरपंचपदी शंकर बामनवाड विजयी झाले. जंगमवाडी सरपंचपदी शिवनंदा वाडीकर विजयी .श्रीक्ष्रेत्र उमरज सरपंचपदी जयश्री केंद्रे विजयी.सावरगाव नि.येथे सरपंचपदी चऊत्राबाई धर्मेकर विजयी.पोखर्णी येथे सरपंचपदी रमेश केंद्रे विजयी.लालवाडी सरपंचपदी कोमल बोंबले विजयी. सोमठाणा -रेवताबाई गिते विजयी.
मतमोजणी सुरळीत पार पाडण्यासाठी परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी तथा तहसीलदार अनुपसिंह यादव यांनी प्रयत्न केले.त्यांना नायब तहसीलदार संतोष कामठेकर, नायब तहसीलदार नयना कुलकर्णी ,अव्वल कारकून पी.एम.जोंधळे व मन्मथ थोटे, मंडळ अधिकारी एच.एन.सुजलेगावकर ,एस.आर.शेख,चंद्रकांत महाजन ,सतिश शिंदे ,एस.एम.पटणे,केंद्र प्रमुख एन.एम.वाघमारे आदीनी सहकार्य केले.पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता.
कोटबाजार- मोहम्मद अजीमोद्दीन निजामोद्दीन विजयी.
दिग्रस खु - भिमराव कल्याणकर विजयी.
बिनविरोध सरपंच :
गुलाबवाडी -मैनाबाई जोगदंड.
पाताळगंगा -लक्ष्मी मुंडे.
घुबडवाडी -वंदना सोनकांबळे.
गांधीनगर -तुकाराम जाधव.