Nanded: धुलिवंदनानंतर मित्रांसोबत गोदावरी नदी गाठली; पाण्यात बुडून तरुणाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2025 12:44 IST2025-03-15T12:43:24+5:302025-03-15T12:44:30+5:30
मित्रांसोबत स्नान करण्याकरिता गेलेल्या तरूणाचा गोदावरी नदी पात्रातील पाण्यात बुडून करूण अंत

Nanded: धुलिवंदनानंतर मित्रांसोबत गोदावरी नदी गाठली; पाण्यात बुडून तरुणाचा मृत्यू
नांदेड: मित्रांसोबत स्नान करण्यासाठी गेलेल्या २१ वर्षीय तरूणाचा गोदावरी नदीचे पात्रातील पाण्यात बुडून करूण अंत झाला. ही घटना १४ मार्च रोजी दुपारी नांदेडच्या असर्जन शिवारातील गोदावरी नदी पात्रात घडली.
प्रतिक भद्रे असे मृत तरुणाचे नाव आहे.
नांदेड शहरातील श्रावस्तीनगर भागातील संविधान कॉलनी येथील रहिवासी व सुप्रसिद्ध रंगकर्मी, गायक डॉ. विलासराज भद्रे यांचे सुपुत्र प्रतिक भद्रे हे १४ मार्च रोजी त्यांचे मित्रांसोबत असर्जन शिवारातील गोदावरी नदीच्या पात्रात स्नान करण्यासाठी गेले. दरम्यान, शुक्रवारी दुपारी तीन वाजे दरम्यान प्रतिक भद्रे गोदावरी नदी पात्रात पायऱ्यांवर स्नान करताना नदीच्या पात्रात पडले. प्रतिक भद्रे यांना पोहता येत नव्हते, त्यामुळे त्यांचा नदी पात्रातील पाण्यात बुडून करूण अंत झाला असल्याची माहिती पोलीस ठाणे अंमलदार शंकर नलबे व मदतनीस महिला पोलीस अंमलदार पदमा जाधव यांनी दिली. याप्रकरणी मृत प्रतिक यांचे वडील डॉ. विलासराज अमृतराव भद्रे यांनी दिलेल्या माहितीआधारे नांदेड ग्रामीण ठाण्यात शुक्रवारी मध्यरात्री तूर्त आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. पो. नि. ओमकांत चिंचोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक विजयकुमार कांबळे, बीट हेडकॉन्स्टेबल श्यामसुंदर मुपडे व नितीन धुळगंडे हे याप्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.
मृत प्रतिक हा डॉ. विलासराज भद्रे यांचा एकुलता एक मुलगा होता. शुक्रवारी रात्री उशिरा मृत प्रतिक भद्रे यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात गोवर्धन घाट स्मशानभूमीत अंत्यसंकार करण्यात आले. भद्रे परिवारावर कोसळलेला दुःखाचा डोंगर उपस्थितांचे हृदय हेलावून टाकणारा ठरला.