पाच महिन्यांनंतर कारखान्यांचे बॉयलर झाले थंड, उसतोडणी उशिरा झाल्याने शेतकऱ्यांना फटका
By रामेश्वर बालाजीराव काकडे | Published: April 4, 2024 05:37 PM2024-04-04T17:37:18+5:302024-04-04T17:37:56+5:30
चार जिल्ह्यांतील ऊस गाळप संपले, १ कोटी १९ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन
नांदेड : नांदेड विभागात ५ ते १० नोव्हेंबरपासून सुरू झालेले सहकारी व खासगी अशा नांदेड, परभणी, हिंगोली व लातूर या चार जिल्ह्यांतील २९ साखर कारखान्यांचे बॉयलर अखेर पाच महिन्यांनंतर थंड झाले आहे. ऊसगाळप संपले असून, मार्च महिन्याअखेरीस सर्व कारखान्यांनी १ कोटी १७ लाख १२ हजार ६५३ मेट्रिक टन उसाचे गाळप केले. त्यातून १ कोटी १९ लाख ८३,१०५ क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे.
नांदेड विभागासह मराठवाडा तसेच राज्यातील बहुतांश साखर कारखान्यांचा ऊस गाळप हंगाम जवळपास संपलेला आहे. त्यामुळे नांदेड सहसंचालक कार्यालयांतर्गत जिल्ह्यातील कारखान्यांचे बॉयलर बंद झालेले आहेत. गेल्या वर्षी नांदेड विभागात उसाची लागवड उशिराने झाली होती. तसेच तोडणीवेळी अवकाळी पाऊस बरसल्याने अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील ऊस शिल्लक राहिल्याने यंदा मार्चअखेरपर्यंत कारखाने सुरू राहिले. ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात झालेल्या पावसामुळे ऊसतोडणीसाठी शेतात वाहने जात नसल्याने अडचणी आल्या होत्या. त्यामुळे ऊस गाळप सुरू होण्यास बराच विलंब झाला होता. यामुळे शेतातील ऊस बरेच दिवस पडून राहिल्याने शेतकऱ्यांची ओरड सुरू राहिली. तोडणीला येऊनही अनेक दिवस ऊस शेतातच राहिल्याने त्याचा एकरी उत्पादनावर परिणाम झाला. एकरी ४० टन ऊस व्हायचा तिथे २५ ते ३० टनावर उतारा आला.
लातुरमध्ये सर्वाधिक ४९ लाख मे.टन ऊस गाळप
२०२३-२४ या हंगामात लातूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी सर्वाधिक ४९ लाख ५ हजार ९५४ मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे. तर त्यातून ५२ लाख २२ हजार ९३० क्विंटल साखरेचे उत्पादन हाती आले आहे. त्यापाठोपाठ नांदेड जिल्ह्यातील १९ लाख ४१ हजार ९३७ मेट्रिक टन उसाचे गाळप केले असून, १९ लाख ३२ हजार ६३५ क्विंटल साखरेचे उत्पादन झाले. तर परभणी जिल्ह्यातील सात खासगी साखर कारखान्यांनी ३३ लाख ३५ हजार ५४५ मेट्रिक टन उसाचे गाळप झाले असून, ३३ लाख ६८४० क्विंटल साखरेचे उत्पादन निघाले आहे. तर हिंगोली जिल्ह्यातील पाच कारखान्यांनी १५ लाख २९ हजार २१८ मेट्रिक टन उसाचे गाळप केले असून त्यातून १५ लाख २० हजार ७०० क्विंटल साखरेचे उत्पादन निघाले आहे.
शेतकऱ्यांना आर्थिक फटका
जिल्ह्यात यंदा ऊसलागवड जास्त आणि गाळप उशिराने सुरू झाल्याने अनेक शेतकऱ्यांचा ऊस अनेक दिवस तोडणीअभावी शेतातच शिल्लक राहिला होता. काही शेतकऱ्यांनी ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात लागवड केलेल्या उसाची तोडणी पंधरा ते सोळा महिन्यांनंतर झाली. त्यामुळे उसाच्या वजनामध्ये मोठी घट झाल्याने त्याचा शेतकऱ्यांना फटका मोठा आर्थिक फटका बसला आहे.