यंदा भरपूर पाऊस, कोरोनानंतर जिल्ह्यात आता पुराची धास्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:13 AM2021-06-10T04:13:50+5:302021-06-10T04:13:50+5:30
पूरबाधित क्षेत्र नांदेड जिल्ह्यातून वाहणाऱ्या गोदावरी नदी तसेच कयाधू काठावरील गावांना आणि जमिनींना अधिक फटका बसतो. त्यात नांदेड शहरात ...
पूरबाधित क्षेत्र
नांदेड जिल्ह्यातून वाहणाऱ्या गोदावरी नदी तसेच कयाधू काठावरील गावांना आणि जमिनींना अधिक फटका बसतो. त्यात नांदेड शहरात गोदावरीमुळे अनेक कुटुंबांना स्थलांतरितही करावे लागते. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन तसेच आपत्ती व्यवस्थापन विभागाने तयारी केली आहे.
शहरातील अनेक इमारती अन् होर्डिंग धोकादायक
नांदेड शहरातील अनेक इमारती कालबाह्य झाल्या असून, त्या जमिनदोस्त करण्याची मागणीही होत आहे. यामध्ये बहुतांश इमारती या शासकीय कर्मचाऱ्यांसाठी बांधलेल्या आहेत. त्यात जलसंपदा विभाग, पोलीस प्रशासन आणि काही जिल्हा परिषदेच्याही इमारतींचा समावेश आहे. त्याबरोबर शहरातील मुख्य रस्त्यालगत असलेल्या इमारतीवरील मोठे होर्डिंग आणि टाॅवरही धोकादायक अवस्थेत आहेत.
जिल्ह्यात कोरोना संकट आता कमी होत असताना, पूर परिस्थितीवर मात करण्यासाठी प्रशासन तयारी करत आहे. त्यासाठी आवश्यक ते प्रशिक्षण तालुकास्तरावर देण्यात आले आहे. तसेच विविध विभागांमध्ये समन्वय साधण्याच्याही सूचना देण्यात आल्या आहेत. - डॉ. विपिन इटणकर, जिल्हाधिकारी, नांदेड.
अग्निशमन दल सज्ज
आगामी पूरपरिस्थिती लक्षात घेऊन आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. पूर आल्यानंतर नदीकाठावरील गावांतील लोकांना कुठे स्थलांतरित करायचे, याचे नियोजनही जिल्हास्तरावर करण्यात आले आहे. नांदेड शहरातील गोदाकाठावरील नागरिकांना पुरापासून संरक्षण करण्यासाठी योग्य त्या सूचना दिल्या आहेत. तसेच ऐनवेळी पूर आल्यास कुठे स्थलांतरित करायचे, याचेही नियोजन करण्यात आले आहे.