पाटील नंतर चव्हाण माय-लेकींना नांदेड जिल्ह्याने केले आमदार; श्रीजया यांनी केलं संधीचे सोनं
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2024 01:41 PM2024-11-27T13:41:29+5:302024-11-27T13:56:36+5:30
नांदेड जिल्ह्यात माय-लेकींना आमदार करणाऱ्या हदगाव व भोकर या दोन मतदारसंघांची वेगळी ओळख राज्यात निर्माण झाली आहे.
नांदेड : भाजपच्या उमेदवार श्रीजया चव्हाण यांनी भोकर मतदारसंघातून निवडणूक जिंकत नांदेड जिल्ह्यात पाचव्या महिला आमदार बनण्याचा बहुमान प्राप्त केला. माय-लेकींना आमदार करणाऱ्या नांदेड जिल्ह्यात श्रीजया यांच्या विजयाने इतिहासाची पुनरावृत्ती झाली आहे.
श्रीजया चव्हाण यांच्यापूर्वी जिल्ह्यात चार महिला आमदार झाल्या. यापूर्वी हदगाव मतदारसंघातून माय-लेकींनी विधानसभेचे नेतृत्व केले होते. अमिता चव्हाण यांच्यानंतर भोकरवासीयांनी श्रीजया यांच्या बाजूने कौल दिला. त्यामुळे नांदेड जिल्ह्यात माय-लेकींना आमदार करणाऱ्या हदगाव व भोकर या दोन मतदारसंघांची वेगळी ओळख राज्यात निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे, २०२४ विधानसभेच्या निवडणुकीत जिल्ह्यात त्या एकमेव महिला आमदार म्हणून प्रतिनिधित्व करणार आहेत.
खासदार अशोकराव चव्हाण यांची कन्या श्रीजयाने यंदा चव्हाण कुटुंबीयांचा पारंपरिक असलेल्या भोकर मतदारसंघातून भाजपकडून निवडणूक लढविली. काँग्रेसचे तिरुपती कोंढेकर यांचा त्यांनी दारुण पराभव केला. माय-लेकीला आमदार करणाऱ्या हदगाव मतदारसंघाची यापूर्वी राज्यात ओळख होती. माय-लेकींना आमदार बनविणारा बहुधा हा राज्यातील एकमेव मतदारसंघ होता. त्याचीच पुनरावृत्ती २०२४मध्ये भोकर मतदारसंघात झाली. नांदेड जिल्ह्यातून संयुक्त महाराष्ट्र असताना अंजनाबाई जयवंत पाटील यांनी जिल्ह्यातील पहिल्या महिला आमदार बनण्याचा मान प्राप्त केला होता. संयुक्त महाराष्ट्रात १९५७ ते १९६२ या काळात अंजनाबाई या पहिल्या महिला आमदार बनल्या. मातब्बर नेते श्यामराव बोधनकर यांचा त्यांनी १९५७ मध्ये पराभव केला होता.
सूर्यकांता पाटील यांनी केले प्रतिनिधित्व
तब्बल १८ वर्षांनी महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर १९८०मध्ये अंजनाबाई यांची मुलगी सूर्यकांता पाटील या हदगावमधून निवडून आल्या होत्या. अत्यंत चुरशीच्या या लढतीत सूर्यकांता पाटील यांनी अवघ्या ५१७ मतांच्या फरकाने बापूराव पाटील शिंदे यांचा पराभव केला होता.
श्रीजया पाचव्या आमदार
अंजनाबाई व सूर्यकांता या माय-लेकींनंतर शिवसेनेच्या अनुसया खेडकर या २००४मध्ये नांदेड उत्तरमधून निवडून आल्या होत्या. २०१४मध्ये भोकर विधानसभा मतदारसंघात अमिता चव्हाण यांनी माजी राज्यमंत्री माधव पाटील - किन्हाळकर यांचा पराभव केला होता. २०२४मध्ये श्रीजयाने भोकरमधून विजय प्राप्त करत पाचव्या महिला आमदार बनण्याचा बहुमान मिळविला आहे.