‘समृद्धी’नंतर आता शक्तिपीठ महामार्ग, गडकरींनी केली होती घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2023 10:55 AM2023-02-07T10:55:47+5:302023-02-07T10:56:56+5:30
राज्य रस्ते विकास महामंडळाने प्रस्तावित केलेला हा महामार्ग राज्यातील १३ जिल्ह्यांतून जाणार आहे.
गोकुळ भवरे -
किनवट (जि. नांदेड) : राज्यातील सर्व शक्तिपीठांना जोडणारा नागपूर ते गोवा हा शक्तिपीठ द्रुतगती महामार्ग प्रस्तावित असून, या महामार्गाने किनवट तालुका देशाच्या नकाशावर येणार आहे.
राज्य रस्ते विकास महामंडळाने प्रस्तावित केलेला हा महामार्ग राज्यातील १३ जिल्ह्यांतून जाणार आहे. माहूर, औंढा नागनाथ, अंबाजोगाई, परळी, तुळजापूर, पंढरपूर, नरसोबाची वाडी, कोल्हापूर या प्रमुख धार्मिक स्थळांना तो जोडला जाणार आहे. हा प्रस्तावित एक्स्प्रेस वे श्रीक्षेत्र माहूर येथून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्र. १६१ ए ला जोडला जाणार आहे.
या महामार्गाच्या जमीन संपादनासाठी सल्लागार समितीची स्थापना झाली आहे. हा महामार्ग श्रीक्षेत्र माहूरला जोडल्यानंतर सारखणी, मांडवी, पिंपळगाव, आदिलाबाद या आंतरराज्य रस्त्यांचे महत्त्व वाढणार आहे.
शिवाय भारतातील प्रमुख राष्ट्रीय महामार्ग असलेल्या कन्याकुमारी ते काश्मीर (क्र. ४४) या मार्गाला जोडला जाणार असल्याने किनवट तालुक्याचे महत्त्व वाढणार आहे.
गडकरींनी केली होती घोषणा
माहूर येथे २३ ऑक्टोबर २०१७ रोजी राष्ट्रीय महामार्गाच्या भूमिपूजनावेळी तत्कालीन आमदार प्रदीप नाईक यांनी सारखणी-मांडवी-आदिलाबाद या ४५ किमीच्या मार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा द्यावा, अशी मागणी केली होती. तर केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दर्जा दिल्याची घोषणा केली होती.
झपाट्याने वाढेल पर्यटन
किनवट तालुक्यात जंगल मोठ्या प्रमाणात आहे. विदर्भातील टिपेश्वर आणि तेलंगणातील आदिलाबाद जिल्ह्यातील कावल व्याघ्र रिझर्व्हमधून किनवटच्या जंगलात वाघांचा अधिवास वाढणार आहे. त्यामुळे या भागात पर्यटन वाढणार असून, तालुक्याच्या महसुलातही वाढ होईल.