सरपंच आरक्षण सोडतीनंतर चुरस वाढली, प्रस्थापित नेत्यांची गावातच कोंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2020 12:18 AM2020-11-22T00:18:44+5:302020-11-22T00:20:02+5:30
अनेक दिग्गज राजकारण्यांच्या गावातील सरपंचपद राखीव
नांदेड : जिल्ह्यातील आमदार, माजी आमदारांसह दिग्गज नेत्यांनी आपल्या गावातील प्रमुख पदाधिकाऱ्यांना सरपंचपदी वर्णी लावण्याची ग्वाही दिली होती. मात्र गुरुवारी झालेल्या १३०९ ग्रामपंचायतींच्या आरक्षण सोडतीत अनेक दिग्गज राजकारण्यांच्या गावातील सरपंचपद राखीव झाल्याने पदाधिकाऱ्यांची कोंडी झाली आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्यातील तब्बल ५८४ ग्रामपंचायतींवर महिलाराज येणार असल्याचेही स्पष्ट झाले आहे.
बिलोली तालुक्यातील खतगाव या माजी खा. भास्करराव पाटील खतगावकर यांच्या गावातील सरपंचपदाचे आरक्षण ओबीसी महिलासाठी आहे. तर बिलोली तालुक्यातीच माजी आ. गंगाराम ठक्करवाड यांच्या कासराळीचे सरपंचपद अनुसूचित जातीसाठी जाहीर झाले आहे. आ. रावसाहेब अंतापूरकर यांच्या देगलूर तालुक्यातील अंतापूर या गावचे सरपंचपद मागास प्रवर्ग महिलेसाठी तर भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश पाटील यांच्या बेंम्बरा या गावचे सरपंचपद अनुसूचित जाती महिलेसाठी राखीव झाले आहे. तीच बाब जि. प. सदस्य अनुराधा पाटील यांचे गाव असलेल्या खानापूरचे सरपंचपद अनुसूचित जाती महिलेसाठी राखीव झाले आहे.
देगलूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अंकुश देसाई देगावकर यांचे गाव असलेल्या देगाव बु. चे सरपंचपद सर्वसाधारण महिलेसाठी तर काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रीतम देशमुख यांच्या हणेगावचे सरपंचपद मागास प्रवर्गातील महिलेसाठी राखीव झाले आहे. मुक्रमाबाद येथील ग्रामीण जिल्हाध्यक्ष व्यंकटराव गोजेगावर यांच्या गोजेगावचे सरपंचपद अनुसूचित जातीसाठी राखीव झाले आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गोविंदराव नागेलीकर यांच्या मुदखेड तालुक्यातील नागेलीचे सरपंचपद सर्वसाधारण महिलेसाठी, तालुकाध्यक्ष उद्धवराव पवार आणि बालाजी सूर्यतळे यांचे गाव असलेल्या निवघ्याचे सरपंचपद अनुसूचित जाती महिलेसाठी राखीव झाले आहे.
हदगाव तालुक्यातील विधानसभेचे पराभूत उमेदवार बाबूराव कदम यांच्या कोहळी गावचे सरपंचपद अनुसूचित जाती महिलेसाठी तर जि.प.सदस्य मारोती लाेखंडे यांच्या तळणी गावचे सरपंचपद मागास प्रवर्गासाठी राखीव झाले आहे. काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष बी. आर. कदम आणि युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तिरुपती कोंढेकर यांच्या कोंढा गावचे सरपंचपद सर्वसाधारण महिलेसाठी, काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस संजय देशमुख यांच्या लहान गावचे सरपंचपद मात्र खुले झाले आहे. माजी जि. प. अध्यक्ष माणिकराव इंगोले, माजी जि. प. सदस्य नागोराव इंगोले, शेतकरी नेते प्रल्हाद इंगोले यांच्या मालेगावचे सरपंचपदही खुले झाले आहे. तर शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य बबनराव बारसे यांच्या बारस गावचे सरपंचपद अनुसूचित जाती महिलेसाठी राखीव झाले आहे.
चिखली अ.जातीसाठी तर आष्टी अ.जाती महिलेसाठी
खा.प्रताप पाटील चिखलीकर यांचे कंधार तालुक्यातील चिखली गावचे सरपंचपद अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाले आहे. तर हदगावचे माजी आ. नागेश पाटील आष्टीकर यांच्या आष्टी गावचे सरपंचपदही अनुसूचित जाती महिलसाठी आरक्षित झाले आहे. माजी खा.सुभाष वानखेडे यांच्या ल्याहरी गावातही आता अनुसूचति जमाती प्रवर्गातील सरपंच असेल माजी खा.डॉ.केशवराव धोंडगे व माजी आ.गुरुनाथराव कुरुडे यांच्या बहाद्दरपुरा गावचे सरपंचपद अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाले आहे. माजी आ.शंकरअण्णा धोंडगे यांच्या बाचोटी गावच्या सरपंचपदी अनुसूचित जाती प्रवर्गातील महिला येईल. माजी आ.ईश्वरराव भोसीकर यांच्या पानभोसीचे सरपंचपद मागास प्रवर्गासाठी तर आ.श्यामसुंदर शिंदे यांच्या हळदा गावचे सरपंचपद महिलेसाठी आरक्षित झाले आहे.