हळदीपाठोपाठ तुरीच्या भावातही वाढ,
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 04:16 AM2021-02-08T04:16:01+5:302021-02-08T04:16:01+5:30
नांदेड : कोरोना महामारी काळात आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना आपला माल व्यापाऱ्यांना बेभाव द्यावा लागला; परंतु आज शेतकऱ्यांकडे माल ...
नांदेड : कोरोना महामारी काळात आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना आपला माल व्यापाऱ्यांना बेभाव द्यावा लागला; परंतु आज शेतकऱ्यांकडे माल नसताना हळद, तूर, मूग आदींची मागणी वाढल्याने भावातही वाढ होत आहे. आता त्याचा फायदा शेतकऱ्यांना कमी आणि व्यापाऱ्यांना अधिक होत आहे.
नांदेड जिल्ह्यात ऊस, केळीबरोबर हळद, कापूस आणि सोयाबीनचे पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे; परंतु मागील काही दिवसांत शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळत नसल्याने त्यांनी पीक पद्धती बदलली आहे. जिल्ह्यात आजघडीला सोयाबीनचे पीक सर्वाधिक घेतले जाते. त्यापाठोपाठ केळी, ऊस, हळद आदी पिकांचा समावेश आहे. जिल्ह्यात आंतरपीक म्हणून तूर सर्वाधिक घेतली जाते. यंदाच्या हंगामात जिल्ह्यात जवळपास ७४ हजार हेक्टरवर तुरीची पेरणी झालेली आहे; परंतु यंदाचे हवामान आणि ऐन फुले-शेंगा लागण्याच्या काळात ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसामुळे उत्पादनात घट झाली. त्याचा फटका तूर उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे, तर बहुतांश शेतकऱ्यांच्या तुरीला शेंगा लागल्याच नाहीत. दरम्यान, आजघडीला तुरीला साडेपाच ते आठ हजार रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत आहे. काही दिवसांपूर्वी हळदीला तेजी आली असून, नऊ हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंत हळद विकली गेली. हळदीपाठोपाठ तुरीच्या भावात झालेली वाढ दिलासादायक आहे; परंतु आज तूर अथवा हळद शेतकऱ्यांकडे नसून व्यापारी, अडते यांच्याकडे आहे. सदर भाववाढ ही व्यापारी वर्गाला लाभदायी ठरणारी आहे. मार्च, एप्रिल महिन्यात नवीन हळद बाजारात येईल तेव्हा हळदीला हाच भाव राहिला तर नक्कीच शेतकऱ्यांना दिलासा मिळेल.
यंदा कोरोनामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. दरम्यान, काही दिवसांपासून बाजारपेठ पूर्वपदावर येत आहे. त्यात हळदीपाठोपाठ तुरीचेही भाव वाढले. अशीच भाववाढ सर्वच शेतमालाची झाली तर शेतकऱ्यांना दिलासा मिळेल.