तस्करीसाठी कुख्यात चिखलीत पुन्हा धाड; अख्या गावाचा आहे सहभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2020 08:17 PM2020-01-08T20:17:41+5:302020-01-08T20:20:48+5:30
१९९५ पासून वनविभागाची सलग कारवाई तरीही सागवानाची तस्करी थांबेना
किनवट : सागवानासह इतर मौल्यवान लाकडांच्या तस्करीसाठी नांदेड जिल्ह्यात कूप्रसिद्ध असलेल्या चिखली गावात पुन्हा ७ जानेवारीच्या पहाटे वनविभागाच्या पथकाने धाड मारली़ या धाडीत सव्वालाख रुपयांचे सागवान जप्त करण्यात आले आहे़ १९९५ पासून या गावावर वनविभागाच्या वतीने धाडी मारल्या जात असल्या तरी, तेथील सागवानाची तस्करी थांबत नसल्याने चिखली ग्रामस्थांच्या या तस्करी प्रकरणाकडे आता वेगळ्या अंगाने पाहण्याची गरज दिसत आहे़
तालुक्यात लाकूड तस्करीसाठी कूप्रसिद्ध असलेल्या चिखली (बु) येथे वनविभागाने महसूल विभागाच्या उपस्थितीत ७ जानेवारी रोजी भल्या पहाटे धाड टाकली़ यावेळी १ लाख १४ हजार ६२५ रुपये किमतीचे सागवानाचे मौल्यवान कटसाईज व गोल माल १९४ नग जप्त केले़ यापूर्वी आॅपरेशन ब्ल्यू मुन ,आॅपरेशन चिखली यासारखी मोहीम राबवून लाखों रुपये किमतीचा माल जप्त केला होता़
चिखली (बु) गावात अवैध सागवानी लाकडाची तस्करी मोठ्या प्रमाणात होत असल्याची गुप्त माहिती वनविभागाला मिळाली होती़ त्यावरून नांदेडचे उपवनसंरक्षक आशिष ठाकरे, किनवटचे प्रभारी सहाय्यक वनसंरक्षक व्ही़ एऩ गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी साडेसहा वाजता नायब तहसीलदार सर्वेश मेश्राम व वनक्षेत्रपाल के़ एऩ खंदारे, बी़पी़आडे, पीक़े़शिंदे, किनवट फिरत्या पथकाचे योगेश शेरेकार, अविनाश तैनाक, श्रीकांत जाधव, आऱआऱचोबे, वनपाल के़जी़ गायकवाड, एस़ एऩ सांगळे, आऱ एऩ सोनकांबळे, मोकले व महिला कर्मचाऱ्यांनी चिखली (बु) येथे धाड टाकली़
यावेळी अवैध साठवून ठेवलेले ७६ हजार ३१९ रुपये किमतीचे १५७ कटसाईज मौल्यवान सागवान व ३८ हजार ३०६ रुपये किमतीचे गोल माल ३७ नग असा १ लाख १४ हजार ५२५ रुपये किमतीचे १९४ नग जप्त केले़ पहाटेच वनविभागाने चिखली गावाला अक्षरश: गराडा घातला होता़ यावेळी घरांची झडती सुरु असताना, काही जणांनी नायब तहसीलदार सर्वेश मेश्राम व वनविभागाच्या कर्मचाऱ्याला जाब विचारला़ महिला वन कर्मचाऱ्यांना वाईट वागणूक दिली़
गावातील शेकडो जणांवर तस्करीचे गुन्हे
चिखली हे गाव सागवान तस्करीसाठी जिल्ह्यात कूप्रसिद्ध आहे़ १९९५ मध्ये उपवनसंरक्षक असलेल्या एमक़े़राव त्यानंतर खांडेकर, राजेंद्र नाळे, आशिष ठाकरे यांच्या कार्यकाळात चिखली गावावर अनेकवेळा धाडी टाकण्यात आल्या़ आॅपरेशन ब्लू मून, आॅपरेशन चिखली राबविण्यात आले़ या ठिकाणाहून प्रत्येकवेळी दोन ते तीन ट्रक भरुन सागवान जप्त करण्यात आले़ तस्करी प्रकरणात आतापर्यंत शेकडो जणांवर गुन्हे नोंदविण्यात आले आहेत़चिखली गावातील नागरिक पिढ्यान्पिढ्या जंगलातील वनसंपदेवर गुजराण करीत आले आहेत़ गाव व परिसरात दुसरे काम नसल्यामुळे नवीन पिढीही सागवान तस्करीला लागली आहे़ सागवान तस्करीतून चांगले पैसेही मिळतात़ गावात निरक्षतेचे प्रमाणही अधिक आहे़ त्यामुळे या गावातील लोकांसाठी एखादा प्रकल्प सुरु केल्यास सागवान तस्करीला आळा घालता येवू शकतो़