पुन्हा अवकाळीचा तडाखा; झाडे आडवी, वीज गेली, शेतकऱ्यांची उडाली तारांबळ
By रामेश्वर बालाजीराव काकडे | Updated: April 25, 2024 19:03 IST2024-04-25T19:03:39+5:302024-04-25T19:03:47+5:30
सध्या शेतामध्ये ज्वारी, हळद यासह अन्य पिकांच्या काढणीचे काम सुरू आहे.

पुन्हा अवकाळीचा तडाखा; झाडे आडवी, वीज गेली, शेतकऱ्यांची उडाली तारांबळ
नांदेड - शहरासह जिल्ह्यातील अनेक तालुक्यात मंगळवारी रात्री उशिरा वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने तडाखा दिला. या पावसामुळे शेतकऱ्यांची मोठी तारांबळ उडाल्याचे चित्र दिसून आले. सध्या शेतामध्ये ज्वारी, हळद यासह अन्य पिकांच्या काढणीचे काम सुरू आहे. विशेषता जिल्ह्यातील अर्धापूर, नांदेड, मुदखेड, हदगाव, भोकर यासह अन्य तालुक्यात मंगळवारी रात्री नऊ वाजताच्या दरम्यान, अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे सर्वांचीच मोठी धावपळ झाल्याचे पहायला मिळाले.
हवामान विभागाने २९ एप्रिल ते ५ मे या कालावधीत तापमानाचा पारा वाढेल, असा अंदाज वर्तविला आहे. पण, त्याआधीच वादळी वारे व मेघगर्जनेसह अवकाळी पावसाने हजेरी लावल्याचे दिसून येते. हळद शिजवून वाळण्यासाठी ठेवलेली हळद पावसात भिजली आहे. अनेक शेतकऱ्यांनी हळद भिजवू नये, यासाठी ताडपत्रीचा ही उपयोग केला. तर काही शेतकऱ्यांना वेळेवर शेती पिके झाकणे जमले नाही, त्याचा फटका हळद उत्पादकांना बसला आहे. सध्या शेतात उन्हाळी पिकांची काढणी सुरू असून शेतकरी कामात व्यस्त आहेत.
काही भागात झाडे उन्मळून पडली
पावसासह जोराचा वारा सुटल्याने अनेक भागातील झाडे उन्मळून पडल्याने रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती. त्यानंतर नागरिकांनी रस्त्यावरील झाडांच्या फांद्या बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.
विद्युत पोल वाकले, वीज तारा तुटल्या
अवकाळीने सर्वांची दाणादाण केली असून, अनेक तालुक्यात विद्युत पोल वाकले असून, वीज तारा ही तुटल्या आहेत. त्यामुळे नांदेड शहरातील बहुतांश भागासह तालुक्यातील काही गावांत वीजपुरवठा रात्रभर गुल झालेला होता.
ऊन पावसाचा खेळ सुरू
गेल्या काही दिवसांत जसजसा तापमानाचा पारा वाढत आहे, तसतसा ऊन पावसाचा खेळ सुरू झाल्याचे दिसून येते. अधूनमधून पडणाऱ्या अवकाळीने वातावरणात बदल जाणवत आहे. त्यामुळे सर्दी, खोकला, तापीच्या रुग्णांत वाढ झालेली आहे.