राज्य परिचारिका संघटनेचे आंदोलन सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:14 AM2021-06-25T04:14:37+5:302021-06-25T04:14:37+5:30
शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालयात ४०० परिचारिका कार्यरत आहेत. या सर्व परिचारिका संपावर गेल्याने वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने नर्सिंग स्टुडंटची मदत ...
शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालयात ४०० परिचारिका कार्यरत आहेत. या सर्व परिचारिका संपावर गेल्याने वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने नर्सिंग स्टुडंटची मदत घेऊन रुग्णांना वैद्यकीय सेवा पुरवल्या. नांदेडमध्ये जिल्हा रुग्णालयातही हे आंदोलन सुरू आहे. येथील सर्व परिचारिका संपामध्ये सहभागी झाल्या आहेत. जिल्हाध्यक्ष भागीरथी मुदीराज, सरचिटणीस केशव जिंकलवाड, रवी सिशोदे आदींनी शासन मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत आंदोलन सुरुच राहील, अशी भूमिका स्पष्ट केली तर जिल्हा रुग्णालयातील परिचारिका संघटनेच्या जिल्हाध्यक्षा संतोषी मंगोत्रा यांनीही कोरोना संकटात जीवाची बाजी लावून काम करणाऱ्या परिचारिकांचे प्रश्न सोडवणे गरजेचे असल्याचे सांगितले. प्रश्न सुटेपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असेही त्या म्हणाल्या. विष्णूपुरी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रदीप बोडके यांनी सांगितले, परिचारिकांच्या मागण्यासंदर्भात राज्यस्तरावरच तोडगा निघणे अपेक्षित आहे. शासकीय रुग्णालयातील आरोग्यसेवेवर या संपाचा कोणताही परिणाम झाला नाही. नर्सिंग स्टुडंटसह कंत्राटी कर्मचारी तसेच संपात सहभागी न झालेल्या परिचारिका रुग्णांना सेवा देत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.