पिंपळगाव परिसरात आंदोलकांनी पेटविला ट्रक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2018 12:37 AM2018-08-10T00:37:02+5:302018-08-10T00:37:34+5:30
नांदेड ते अर्धापूर राष्ट्रीय महामार्गावर महादेव पिंपळगाव परिसरात आंदोलनकर्त्यांनी उभा असलेला ट्रक पेटवून दिला़ ही घटना गुरूवारी सायंकाळी घडली़ यामध्ये ट्रकचे मोठे नुकसान झाले असून अग्निशमनच्या जवानांना आग आटोक्यात आणण्यात यश आले़
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : नांदेड ते अर्धापूर राष्ट्रीय महामार्गावर महादेव पिंपळगाव परिसरात आंदोलनकर्त्यांनी उभा असलेला ट्रक पेटवून दिला़ ही घटना गुरूवारी सायंकाळी घडली़ यामध्ये ट्रकचे मोठे नुकसान झाले असून अग्निशमनच्या जवानांना आग आटोक्यात आणण्यात यश आले़
यात ट्रकचे पाच लाख रुपयांचे नुकसान झाले. देगलूर तालुक्यातही एस.टी. आगारातील एम.एच.२०-व्हीएल- ३९०३ या बसच्या काचा फोडल्या. या बसचे २५ हजाराचे नुकसान झाले. हाणेगाव येथे पंचायत समितीच्या एम.एच. २६ आर-१७८ क्रमांकाच्या जीपवर दगडफेक केली़ उमरी बसस्थानक आणि रेल्वेस्टेशनवर किरकोळ दगडफेक झाली तर हदगाव तालुक्यात एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयातील एम.एच.२६- ५६९० क्रमांकाची जीप अज्ञात व्यक्तींनी पेटवून दिली. हिमायतनगर तालुक्यात जवळगाव येथे दुपारी ४ च्या सुमारास नागपूर-मुंबई ही नंदीग्राम एक्सप्रेस येथे रोखली.
पार्डी येथे आंदोलनकर्त्यांनी लोहा नगरपरिषदेच्या अग्निशमन वाहनावर दगडफेक केली. यात काचा फोडून ५० हजार रुपयांचे नुकसान झाले. जिल्ह्यात नांदेड, भोकर, मुदखेड, किनवट, माहूर, मुखेड, बिलोली, नायगाव, धर्माबाद आणि कंधार तालुक्यात मराठा आरक्षण आंदोलन शांततेत पार पडले.
---
नवीन नांदेडात बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद
नवीन नांदेडात बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विष्णूपुरी, असर्जन, लातूर फाटा, वाजेगाव, चंदासिंग कॉर्नर, तुप्पा पाटी,धनेगाव आदी ठिकाणी रास्तारोको करण्यात आला़ नांदेड ते लातूर जाणाऱ्या राष्टÑीय महामार्गावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, विष्णूपुरी येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा रूग्णालयासमोरील मुख्य रस्त्यावर, नांदेड ते हैद्राबाद मुख्य रस्त्यावरील वाजेगाव, चंदासिंघ कॉर्नर व तुप्पा पाटी या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले़ रस्त्यावर झाडे टाकुन तसेच टायर जाळून रस्त्यावरील रहदारी रोखण्यात आली़ रस्त्यावर पेटवून दिलेले टायर विझविण्यासाठी अग्निशमन दलास पाचारण करण्यात आले होते़ गुरूवारी सिडकोतील बाजार असूनदेखील या भागात कोणी फिरकले नाही़
---
जिल्ह्यात जाळपोळ, दगडफेकीचे किरकोळ प्रकार वगळता सर्वत्र मराठा आरक्षण आंदोलन शांततेत पार पडल्याची माहिती जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दिली. पोलिसांसह सर्वच विभागाने समन्वय राखल्याचेही ते म्हणाले.
बससेवा बंद ठेवल्याने नांदेड आगारातून एकही बस बाहेर पडली नाही़ तर जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आली होती़ खासगी शिकवण्यादेखील बंद होत्या़ त्यामुळे नेहमी विद्यार्थ्यांची वर्दळ असणाºया भाग्यनगर रस्त्यावर शुकशुकाट पहायला मिळाला़