शेती तर पाहिजे, मग शेतीत करिअर का नाही? कृषी अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांची पाठ
By राजेश निस्ताने | Published: August 2, 2024 08:46 AM2024-08-02T08:46:13+5:302024-08-02T08:46:52+5:30
राजेश निस्ताने, लोकमत न्यूज नेटवर्क, नांदेड : शेतकरी विविध समस्यांचा परिणाम शेतीवरच नव्हे तर कृषी अभ्यासक्रमांवरही होऊ लागला आहे. ...
राजेश निस्ताने, लोकमत न्यूज नेटवर्क, नांदेड : शेतकरी विविध समस्यांचा परिणाम शेतीवरच नव्हे तर कृषी अभ्यासक्रमांवरही होऊ लागला आहे. यंदा कृषी अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांचा कल मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. हा शेतीच्या दुरवस्थेचा परिणाम मानला जात आहे.
राज्यात परभणी, अकोला, राहुरी व दापोली येथील कृषी विद्यापीठांतर्गत एकूण १७४ कृषी महाविद्यालये असून, तेथील विद्यार्थिक्षमता १७ हजार ९०६ एवढी आहे; परंतु, या वर्षी प्रवेशासाठी तीन वेळा मुदतवाढ देऊनही विद्यार्थ्यांचा म्हणावा तेवढा प्रतिसाद लाभलेला नाही.
शेतीत उज्ज्वल भविष्य नाही?
कृषी अभ्यासक्रमात ८० टक्के विद्यार्थी हे शेतकरी, शेतमजुरांची मुले किंवा शेतीवर अवलंबून असणारे असतात. मात्र, त्यांना शेतीत स्वत:चे उज्ज्वल भविष्य दिसत नाही. त्यातच संशोधक, प्राध्यापक, ग्रामसेवक, कृषिसेवक भरती नसल्याने उदासीनता आहे. त्यामुळेच की काय, शेती व कृषी क्षेत्राशी निगडित अभ्यासक्रमावरही अवकळा आली आहे.
...ही कारणेही महत्त्वाची
शासकीय कृषी महाविद्यालयांत सोयीसुविधांचा अभाव आणि अनेक जागा रिक्त. खासगी महाविद्यालयात पूर्ण पगार मिळत नसल्याने तेवढ्या गुणवत्तेचे प्राध्यापक नाहीत. निसर्गाचा लहरीपणा, शेती खर्च, उत्पादन घट, भाव न मिळणे, महागाई, मजूर टंचाई अशा कारणांनी शेतकरी त्रस्त आहे. त्यातूनच शेती विकणे, पडीक राहणे असे प्रकार घडतात. ही अवस्था पाहून शेतकऱ्याचा मुलगा शेतकरी होण्यास तयार नाही.
अशी मिळाली मुदतवाढ
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख : १५ जुलै २०२४
पहिली मुदतवाढ : २२ जुलै
दुसरी मुदतवाढ : २८ जुलै
तिसरी मुदतवाढ : ३१ जुलै.