अहो आश्चर्यम्... फरार आरोपी अधिकारी कर्तव्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 04:13 AM2021-06-27T04:13:23+5:302021-06-27T04:13:23+5:30
नांदेड : राज्यभरात गाजलेल्या कृष्णूर येथील मेगा ॲग्रो अनाज कंपनीतील धान्य घोटाळ्यात फरार असलेले तत्कालीन निवासी उपजिल्हाधिकारी संतोष वेणीकर ...
नांदेड : राज्यभरात गाजलेल्या कृष्णूर येथील मेगा ॲग्रो अनाज कंपनीतील धान्य घोटाळ्यात फरार असलेले तत्कालीन निवासी उपजिल्हाधिकारी संतोष वेणीकर यांचा गेल्या दोन वर्षांपासून सीआयडी शोध घेत आहेत. सीआयडीनुसार वेणीकर हे फरार आहेत; परंतु असे असताना गेल्या अनेक दिवसांपासून ते परभणी जिल्ह्यातील भूसंपादन कार्यालयात कर्तव्यावर आहेत. आता ईडीने या प्रकरणात एन्ट्री घेतल्यानंतर गेल्या दोन दिवसांपासून ते कार्यालयात आलेच नाहीत.
वेणीकर हे पूर्वी नांदेडला जिल्हा पुरवठा अधिकारी होते. त्यानंतर निवासी उपजिल्हाधिकारी झाले होते. ते पुरवठा अधिकारी असतानाच नांदेडात धान्याचा काळाबाजार झाला होता. परभणीलाही पुरवठा अधिकारी असताना धान्य घोटाळा उघडकीस आला होता.
नांदेडात जुलै २०१८ मध्ये तत्कालीन पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांच्या पथकाने स्टिंग ऑपरेशन करून शासकीय धान्याचा काळाबाजार उघडकीस आणला होता. शासकीय गोदामातून धान्याचे ट्रक कृष्णूर येथील मेगा ॲग्रो अनाज कंपनीत जात होते. या प्रकरणाचा भंडाफोड झाल्यानंतर मेगा इंडियाचे मालक अजय बाहेती यांच्यासह व्यवस्थापक ओमप्रकाश तापडिया, वाहतूक कंत्राटदार राजू पारसेवार, ललित खुराणा यांच्यासह १९ जणांवर गुन्हा नोंदविण्यात आला होता. त्यावेळी वेणीकर यांचा आरोपी म्हणून सहभाग नव्हता; परंतु वेणीकरांनी स्वत:हून न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला. न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयाने सीआयडीला वेणीकरांची छायाचित्रे त्यांच्या ओळखीच्या जागी डकविण्याचा आदेश दिला होता. तेव्हापासून जवळपास दोन वर्षे वेणीकर हे पोलीस दप्तरी फरारीच आहेत. मध्यंतरी कोरोना झाल्यामुळे हैदराबाद येथे वेणीकरांवर उपचार करण्यात आले. उपचारानंतर ते परभणी येथील भूसंपादन कार्यालयात रुजू झाले होते; परंतु ही बाब घोटाळ्याचा तपास करणाऱ्या सीआयडीला कळली नव्हती, याचे आश्चर्य वाटते. दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून वेणीकर हे कार्यालयात आले नाहीत. त्यात शुक्रवारी रात्री ईडीने इंडिया मेगाच्या अजय बाहेती यांना उचलले. त्यामुळे ईडीच्या कारवाईची कुणकुण वेणीकर यांना लागली का? असाही संशय आहे. दरम्यान, परभणी येथील धान्य घोटाळ्यातही वेणीकरांचे नाव आले होते. या ठिकाणी अशाच प्रकारे धान्याचा काळाबाजार करण्यात आला होता.
दोन दिवसांपासून कार्यालयात नाहीत
वेणीकर हे गेल्या दोन दिवसांपासून कार्यालयात आले नाहीत. त्यांनी रजा दिलेली नाही. ते कार्यालयात का आले नाहीत, याबाबत त्यांना विचारणा करतो, अशी प्रतिक्रिया परभणीचे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिली.
रुजू झाल्यास अटक करू
यासंदर्भात सीआयडीचे उपाधीक्षक मच्छिंद्रे खाडे यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले, रुग्णालयाच्या कामामुळे मी तिकडेच व्यस्त आहे. वेणीकरांची अद्याप बेल झाली नाही. ते जर हजर झाले असतील, तर त्यांना अटक करू.