माळेगावात अहिल्यागड उभारणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2019 12:32 AM2019-01-07T00:32:49+5:302019-01-07T00:34:11+5:30
भाजपाने धनगर समाजाचा विश्वासघात केल्याने श्रीक्षेत्र माळेगाव येथील खंडोबाराया येणाऱ्या निवडणुकीत भाजपाचा खेळखंडोबा केल्याशिवाय राहणार नाही
माळाकोळी : भाजपाने धनगर समाजाचा विश्वासघात केल्याने श्रीक्षेत्र माळेगाव येथील खंडोबाराया येणाऱ्या निवडणुकीत भाजपाचा खेळखंडोबा केल्याशिवाय राहणार नाही, असे प्रतिपादन धनगर समाजाच्या ज्येष्ठ नेत्या तथा राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर यांनी माळेगाव येथील धनगर आरक्षण महामेळाव्यात केले. यावेळी त्यांनी पुढील वर्षी माळेगावात अहिल्यागड उभारणार असे जाहीर केले.
कार्यकमास आ.रामराव वडकुते ,माजी आ.शंकरअण्णा धोंडगे, माजी आ. बाबासाहेब पाटील, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष समाधान जाधव, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष दिलीप धोंडगे, कार्याध्यक्ष दत्ता पवार , प्रांजली रावणगावकर, जि. प. सदस्य डॉ. विजय धोंडगे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.
रविवारी श्रीक्षेत्र माळेगाव येथील खंडोबारायाच्या यात्रेत भाजपाने धनगर आरक्षण जागर महामेळाव्याचे तर राष्ट्रवादी काँग्रेसने धनगर आरक्षण ललकार महामेळाव्याचे आयोजन केले होते. भाजपाकडून राज्याच्या मंत्री ना.पंकजा मुंडे, पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांना आमंत्रित करण्यात आले होते. तर राष्ट्रवादीच्या वतीने खा. सुप्रिया सुळे, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना आमंत्रित करण्यात आले होते. परंतु, ऐनवेळी खा. सुप्रिया सुळे यांचा दौरा रद्द झाल्याने त्यांच्या ठिकाणी धनंजय मुंडे येणार असल्याचे घोषित केली होते. ना. पंकजा मुंडे व आ. धनंजय मुंडे हे बहीण-भाऊ काय बोलणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते; पण धनंजय मुंडे यांनीही धनगर समाज महामेळाव्यात काढता पाय घेतल्याने धनगर समाजाच्या आक्रमक नेत्या सक्षणा सलगर यांनी धनगर समाजाच्या आरक्षणावरून भाजपा सरकारवर आरोपांच्या फैरी झाडल्या. त्या म्हणाल्या, सत्तेत नव्हतात तेव्हा तुम्हाला धनगरांचा पुळका होता. धनगर समाजाला आरक्षण देऊ असे म्हणून तुम्ही राज्याची सत्ता काबीज केली़ मात्र गेली चार वर्षांत भाजपा सरकारने धनगरांची उपेक्षाच केली. तुम्हाला धनगर समाजाने आरक्षणासाठी मते दिली होती़ तुम्ही धनगर समाजाचा विश्वासघात केलात. माळेगावचा जागृत खंडोबाराया तुम्हाला कधीच माफ करणार नाही. येत्या निवडणुकीत खंडोबाराया भाजपचा खेळखंडोबा करतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. पुढील वर्षी माळेगाव यात्रेत अहिल्यादेवी होळकर यांचा अहिल्यागड उभारणार अशी ग्वाही त्यांनी दिली.
माजी आ. शंकर अण्णा धोंडगे यांनीही मनोगत व्यक्त केले.