एअर इंडिया लवकरच सुरु करणार नांदेड - दिल्ली विमानसेवा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2017 04:43 PM2017-12-08T16:43:38+5:302017-12-08T16:50:40+5:30
केंद्र सरकारच्या महत्वकांक्षी उडान योजनेअंतर्गत लवकरच नांदेड - दिल्ली ही एअर इंडीयाची विमानसेवा सुरु होणार आहे. अमृतसर किंवा चंदीगढ मार्गे ही विमानसेवा सुरु होणार असून त्यामुळे सचखंड गुरुद्वारा येथे दर्शनासाठी येणा-या भाविकांची मोठी सोय होणार आहे़
नांदेड : केंद्र सरकारच्या महत्वकांक्षी उडान योजनेअंतर्गत लवकरच नांदेड - दिल्ली ही एअर इंडीयाची विमानसेवा सुरु होणार आहे. अमृतसर किंवा चंदीगढ मार्गे ही विमानसेवा सुरु होणार असून त्यामुळे सचखंड गुरुद्वारा येथे दर्शनासाठी येणा-या भाविकांची मोठी सोय होणार आहे़ अशी माहिती विमानतळ विकास प्राधिकरण कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक सुरेश काकाणी यांनी दिली.
लहान विमानतळ जोडण्यासाठी केंद्र शासनाने उडान ही योजना सुरु केली़ लहान विमानतळांचा विकास करणे आणि सामान्यांना परवडेल अशा दरात विमान प्रवास करता यावा हा यामागील उद्देश आहे़ त्यामध्ये राज्यातील सहा विमानतळांची निवड करण्यात आली होती़ त्यात नांदेडचाही समावेश आहे़ या योजनेतून सुरुवातीला नांदेड-हैद्राबाद ही विमानसेवा सुरु करण्यात आली़ या सेवेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाला़ परंतु काही कारणास्तव नांदेड-मुंबई विमानसेवा रखडली होती़ नोव्हेंबरमध्ये नांदेड-मुंबई विमानसेवेला हिरवा कंदील मिळाला़ त्यामुळे नांदेडवरुन हैद्राबाद आणि मुंबई जाणा-या प्रवाशांची गैरसोय दूर झाली.
नांदेड येथे शीख धर्मियांचे सचखंड गुरुद्वारा हे पवित्र धर्मस्थळ आहे़ या ठिकाणी देश-विदेशातून लाखो भाविक दर्शनासाठी येतात़ त्यामुळे शीख बांधवाकडून नांदेड ते अमृतसर विमानसेवा सुरु करण्याची अनेक वर्षापासूनची मागणी होती़ विमानसेवा नसल्यामुळे भाविकांना रेल्वेने प्रवास करावा लागत होता़ भाविकांकडून होणा-या मागणीचा विचार करुन एअर इंडीया कंपनीने नांदेड ते दिल्ली ही विमानसेवा सुरु करण्यास प्रतिसाद दिला़ ही सेवा अमृतसर किंवा चंदीगढ येथून सुरु होणार आहे़ याबाबत विमानतळ विकास प्राधिकरण कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक काकाणी यांच्यासोबत एअर इंडीयाच्या अधिकाºयांची नुकतेच मुंबई येथे बैठक झाली आहे़ प्रवासी संख्येचा विचार करुन दीडशे किंवा ऐंशी प्रवासी क्षमता असलेले विमान सुरु करण्याबाबत चर्चा सुरु आहे़ येत्या २२ ते २५ डिसेंबर दरम्यान ही सेवा सुरु होण्याची शक्यता आहे.