विद्यापीठातील सर्व प्रबंधांचे होणार डिजिटायझेशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 12:41 AM2018-03-16T00:41:10+5:302018-03-16T00:41:14+5:30
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ स्थापनेपासून विद्यापीठाने ज्या पीएच.डी. संशोधन प्रबंधास मान्यता दिलेली आहे. अशा सर्व प्रबंधाचे डिजीटायझेशन करण्यात येणार असून हे सर्व प्रबंध विद्यापीठ अनुदान आयोगाच्या शोधगंगा या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. यामुळे संशोधक आणि मार्गदर्शकांना साहित्यशोध कार्यात मदत होणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ स्थापनेपासून विद्यापीठाने ज्या पीएच.डी. संशोधन प्रबंधास मान्यता दिलेली आहे. अशा सर्व प्रबंधाचे डिजीटायझेशन करण्यात येणार असून हे सर्व प्रबंध विद्यापीठ अनुदान आयोगाच्या शोधगंगा या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. यामुळे संशोधक आणि मार्गदर्शकांना साहित्यशोध कार्यात मदत होणार आहे.
प्रबंधाचे डिजीटायझेशन हा ज्ञानस्त्रोत केंद्राच्या प्रगतीचा मोठा टप्पा आहे. त्यामुळे ज्ञानस्त्रोत केंद्र अधिक समृद्ध होईल, त्याचबरोबर विद्यापीठाचा शैक्षणिकस्तर उंचावेल, असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर यांनी केले.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या ज्ञानस्त्रोत केंद्रातील पीएच.डी. प्रबंधाचे डिजीटायझेशन कामाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.
पीएच.डी. प्रबंधाचे डिजीटायझेशनसाठीचा प्रस्ताव विद्यापीठाने विद्यापीठ अनुदान आयोगाकडे सादर केला होता. त्यानंतर विद्यापीठ अनुदान आयोग (इन्फलीबनेट) ने मान्य करून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठास अनुदान मंजूर केले आहे.
यावेळी प्र-कुलगुरू डॉ. गणेशचंद्र शिंदे, कुलसचिव डॉ. रमजान मुलानी, वित्त व लेखाधिकारी डॉ. गोविंद कतलाकुटे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. रवी सरोदे, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. राजेश्वर दुडूकनाळे, दूरशिक्षण विभागाचे संचालक प्राचार्य डॉ. राम जाधव, डॉ. अशोक कदम आणि डॉ. शैलेश वढेर यांची उपस्थिती होती. प्रास्ताविक ज्ञानस्त्रोत केंद्राचे प्रभारी संचालक डॉ. जगदीश कुलकर्णी तर सूत्रसंचालन आणि आभार माहिती शास्त्रज्ञ रणजीत धमार्पुरीकर यांनी मानले. यावेळी डॉ. राजेश काळे, गणेश लाठकर, अरुण हंबर्डे, सायलू नरोड, विठ्ठल मोरे, बाबू पोतदार, खाजामिय्या सिद्दिकी, मोहनसिंघ पुजारी, संदीप डहाळे यांच्यासह केंद्रातील कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आज विशेष व्याख्यान
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन व अभ्यास केंद्राच्या वतीने १६ मार्च रोजी केंद्रातील सभागृहात सकाळी ११ वाजता विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी नागपूरच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठातील प्राध्यापक आणि अभ्यासक डॉ.प्रमोद मुनघाटे हे ‘महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार असल्याचे कळविण्यात आले आहे.