'सन्मानाने जगता यावं म्हणून अर्ज केला, आता यश यावं'; तृतीयपंथी ‘भीमा’ला व्हायचंय तलाठी!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2023 06:14 PM2023-08-19T18:14:59+5:302023-08-19T18:21:03+5:30

सार बळ एकवटल अन अर्ज केला, परीक्षेची केली जोरदार तयारी, नांदेड जिल्ह्यातून पहिल्या तृतीयपंथीचा अर्ज दाखल

All strength applied, now the efforts should be successful; Third gender 'Bhima' wants to be Talathi! | 'सन्मानाने जगता यावं म्हणून अर्ज केला, आता यश यावं'; तृतीयपंथी ‘भीमा’ला व्हायचंय तलाठी!

'सन्मानाने जगता यावं म्हणून अर्ज केला, आता यश यावं'; तृतीयपंथी ‘भीमा’ला व्हायचंय तलाठी!

googlenewsNext

- अविनाश पाईकराव 
नांदेड :
ज्या घटकाला समाजाने वेगळ्या दृष्टिकोतून पाहिले, ज्यांनी आजवर टाळ्या वाजवत पैसे मागण्याचे काम केले, तेच तृतीयपंथी आता वेगळा मार्ग निवडताना दिसत असून, नांदेडच्या भीमाशंकर कांबळे या तृतीयपंथीने तलाठी पदासाठी जिल्ह्यातून पहिला अर्ज दाखल करीत समाजापुढे एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. यापूर्वी पोलिस भरती प्रक्रियेतदेखील एका तृतीयपंथीने पोलिस शिपाई पदासाठी अर्ज दाखल केला होता.

समाजातील उपेक्षित घटक असलेल्या तृतीयपंथीनीदेखील मुख्य प्रवाहात येण्यासाठी धडपड सुरू केली आहे. राज्य सरकारकडून त्यांना विविध योजना, नोकरीत सामावून घेण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. असे असताना सिडको भागात राहणाऱ्या भीमाशंकर व्यंकटराव कांबळे (२९) या तृतीयपंथीनीही तलाठी पदासाठी अर्ज दाखल करून स्वत:च्या पायावर उभे राहण्याचा निर्णय घेतला. भीमाने दहावीचे शिक्षण हे गणपतराव मोरे विद्यालय किवळा येथून तर बारावीचे शिक्षण सिडकोतील इंदिरा गांधी ज्युनियर कॉलेजधून घेतले. घरची परिस्थिती हलाखीची असल्याने त्यांनी पदवीचे शिक्षण हे मुक्त विद्यापीठातून घेतले. मात्र पुढे त्यांच्या घरच्यांना ते तृतीयपंथी असल्याचे खटकत होते. 
सततचा त्रास अन् वादाला कंटाळून भीमाने घर सोडण्याचा निर्णय घेतला. नंतर तो तृतीयंपथी गुरुसोबत टाळ्या वाजवत लोकांना पैसे मागण्याचे काम करू लागला. अभ्यासात हुशार असल्याने त्याच्या गुरूंनी त्याला नोकरी करण्यासाठी प्रेरित केले. मागच्या दोन वर्षांपासून भीमा स्पर्धा परीक्षेची तयारीदेखील करत आहे. 

रविवारी आहे परीक्षा
दरम्यान, तृतीयपंथींसाठी काम करणाऱ्या कमल फाउंडेशनने त्याला तलाठी भरतीसाठी लागणाऱ्या कागदपत्रांची जुळवाजुळव करून शेवटच्या दिवशी तृतीयपंथी प्रवर्गातून जिल्ह्यातील तलाठी पदासाठीचा पहिला अर्ज दाखल करून घेतला. रविवारी याच तृतीयपंथी भीमाची तलाठी भरतीच्या परीक्षेचा पेपर आहे. त्यामुळे आता तृतीयपंथी भीमा जर तलाठी झाला तर त्याचा प्रवास अनेकांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरणार आहे.

स्वावलंबी होण्याचा प्रयत्न 
किती दिवस टाळ्या वाजवत भीक मागण्याचे काम करणार? या कामामुळे लोक आम्हाला हिणवतात. आम्हालाही समाजात ताठ मानेने, सन्मानाने जगता यावे. यासाठीच नोकरीचा अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतला. माझ्यासारख्या इतरांनीही स्वत:च्या पायावर उभे राहण्याचा प्रयत्न करावा.
- भीमाशंकर कांबळे, तृतीयपंथी परीक्षार्थी

Web Title: All strength applied, now the efforts should be successful; Third gender 'Bhima' wants to be Talathi!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.