सोडतीद्वारे करावे लागले बियाणे वाटप; बियाणांच्या तुटवड्याने शेतकरी संकटात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2019 07:40 PM2019-11-16T19:40:45+5:302019-11-16T19:42:15+5:30
बियाणांसाठी शेतकऱ्यांची रीघ
बारुळ (जि. नांदेड) : खरीप हातचा गेल्याने शेतकऱ्यांच्या नजरा आता रबी हंगामावर आहेत. मात्र शेतकऱ्यांमागच्या अडचणी संपायला तयार नाहीत. कृषी विभागाच्या वतीने रबी हंगामासाठी बियाणे वाटपाचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी शेकडो शेतकरी बारुळच्या कृषी मंडळ कार्यालयात जमा झाले. मात्र अवघ्या ३५ हरभरा बियाणाच्या बॅगा आल्याने अनेक शेतकऱ्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले.
कृषी विभागाच्या वतीने कृषी उत्पादकता वाढविण्यासाठी विशेष कार्यक्रम राबविला जातो. याअंतर्गत राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून दरवर्षी हंगामनिहाय विविध उपक्रम हाती घेतले जातात. यंदा या अभियानाअंतर्गत रब्बी हंगामात कडधान्य विकास कार्यक्रम राबविण्यात येत आहे. बारूळ कृषी मंडळ कार्यालयातंर्गत ३३ गावे येतात. त्यापैकी तीन गावासाठी ३० हेक्टरसाठी पुरेल इतके हरभऱ्याचे बियाणे प्राप्त झाले होते. यातील बारूळ, भूकमारी व गुंडा या गावासाठी कृषी सहायकांच्या उपस्थितीत बियाणे वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
बारूळ शिवारातील ३२० शेतकऱ्यांनी हरभरा बियाणाचे मागणीसंदर्भात नावे नोंदवली होती. परंतु प्राप्त झालेल्या बॅगा अवघ्या ३५ असल्याने या बॅगा नेमक्या द्यायच्या कुणाला असा प्रश्न उपस्थित झाला. या विषयावरुन काहीकाळ कार्यालय परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. अखेर लक्की ड्रॉ काढून या बॅगांचे वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु बारूळ शिवारातील एका कुटुंबाच्या घरी एकच नाव नोंदणी करण्याची अट असल्याने अनेक शेतकऱ्यांना बियाणापासून वंचित रहावे लागले. यातून गदारोळ वाढल्याने कृषी सहायक गोविंद तोटेवाड हे बियणांचे वाटप न करताच निघून गेले.
नव्या नियमामुळे शेतकरी बियाणापासून वंचित
कृषी विभागाकडून मागील काही वर्षे नियमानुसार १०० हेक्टर शेतीच्या बियाण्याचे वाटप केले जात होते. ते आता नव्या नियमानुसार १० हेक्टर शेतीसाठी वाटप करण्यात येत आहे. या प्रकारामुळे अनेक गरजू शेतकरी या योजनेपासून वंचित राहत आहेत. कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांनाही बियाणाचे वाटप करताना विविध अडचणींचा सामना करावा लागत असल्याने कृषी विभागाने बियाणे वाटपा संदर्भातील जाचक अटी रद्द करण्याची मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.
२०० हेक्टरवर लागवड; १० हेक्टरपुरते बियाणे
बारूळ शिवारात रबी हंगामात साधारण २०० हेक्टर हरभऱ्याची लागवड होते. परंतु कृषी विभागाच्या नवीन नियमानुसार या शिवारातील केवळ दहा हेक्टर साठी बियाण्याचे वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला. या दहा हेक्टरसाठी बियाणाच्या अवघ्या ३५ बॅगा आल्याने बारूळ कृषी मंडळ कार्यालयातील ३३ गावातील शेकडो शेतकऱ्यांना याचे वाटप कसे करायचे? असा प्रश्न निर्माण झाला. या प्रकाराबाबत शेतकऱ्यांतून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.