राज्यामध्ये महाआघाडी साथ-साथ, जिल्ह्यातही मित्र पक्षांकडून जुळवाजुळवीचे गणित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:22 AM2021-08-14T04:22:45+5:302021-08-14T04:22:45+5:30
पंचायत समिती नांदेड पंचायत समितीमध्ये आठपैकी सहा जागा काँग्रेसच्या ताब्यात असून सेना-भाजपचे प्रत्येक एक सदस्य आहेत. त्यात शिवसेनेच्या महिला ...
पंचायत समिती
नांदेड पंचायत समितीमध्ये आठपैकी सहा जागा काँग्रेसच्या ताब्यात असून सेना-भाजपचे प्रत्येक एक सदस्य आहेत. त्यात शिवसेनेच्या महिला सदस्याचे निधन झाल्याने ती जागा रिक्त आहे.
जिल्हा परिषद
नांदेड जिल्हा परिषदेत ६३ पैकी २८ जागा काँग्रेसकडे तर राष्ट्रवादी-१०, भाजप-१३, शिवसेना- १०, रासप व अपक्ष प्रत्येकी एक असे संख्याबळ आहे. महाविकास आघाडी सरकार असल्याने नंबर दोनचा पक्ष असूनही भाजपला सत्तेबाहेर रहावे लागले.
महापालिका
नांदेड महापालिकेत काँग्रेसची एकहाती सत्ता असून ८१ पैकी ७३ जागा काँग्रेसच्या ताब्यात आहेत. तर भाजप- ६, शिवसेना - १ आणि अपक्षाकडे १ जागा आहे.
तीन पक्ष तीन विचार
काँग्रेस आणि राष्ट्रावादी पक्षाची अनेकवेळा आघाडी होवून त्यांचे राज्यासह स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये एकत्रित सत्ता राहिलेली आहे. परंतु, शिवसेना आणि काँग्रेस एकमेकांच्या विरोधात राहिलेले आणि वेगवेगळ्या विचारांचे पक्ष पहिल्यांदाच राज्यातील सत्तेत एकत्र आले. आपसुकच राज्यात महाविकास आघाडी सरकार असल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही विचार बाजूला ठेवून एकमेकांना साथ देत महाविकास आघाडीचा गाडा हाकला जात आहे.
शिवसेनेच्या हिंदुत्वावर काँग्रेस, राष्ट्रवादीकडून अनेकवेळा टीकाही व्हायची. परंतु, राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यापासून तीनही पक्षांनी जुळवून घेतल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
पक्षाचे जिल्हा प्रमुख काय म्हणतात...
राज्यातील सरकार स्थीर आहे. तसेच नांदेड जिल्ह्यात कुठेही तीन पक्षांकध्ये वाद नाही. उलट वरिष्ठांकडून येणाऱ्या प्रत्येक आदेशाचे स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून पालन केले जाते. पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आदेशच आमच्यासाठी सर्वकाही असतो. - दत्ता कोकाटे, जिल्हाप्रमुख शिवसेना, नांदेड.
महाविकास आघाडी सरकारमधील मित्र पक्षांमध्ये सर्वकाही सुरळीत सुरू आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अनुषंगाने पक्ष पातळीवर चर्चा सुरू आहे. वरिष्ठांकडून जो आदेश येईल, त्यानूसारच काम केले जाईल. - गोविंद पाटील नागेलीकर, जिल्हाध्यक्ष काँग्रेस, नांदेड.
काँग्रेस हा पूर्वीपासूनच मित्र पक्ष राहिलेला आहे. त्यात शिवसेना सोबत आहे. आजपर्यंत जिल्हा पातळीवर कुठलेही वाद झालेले नाहीत. विकासाच्या अनुषंगानेही महाविकास आघाडीची समन्यायी भूमिका राहिलेली आहे. - हरिहरराव भोसीकर, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, नांदेड.