कोरोना रुग्ण संख्येबरोबर लस घेणाऱ्यांची संख्याही रोडावत चालली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:25 AM2021-09-10T04:25:15+5:302021-09-10T04:25:15+5:30
नायगाव बाजार- तालुक्यातील कोरोनाची साथ रोखण्यासाठी व बाधित रुग्णसंख्येचा आकडा कमी करण्यासाठी शासनाच्या सूचनेप्रमाणे सर्वच विभागाचे अधिकारी-कर्मचारी व ...
नायगाव बाजार- तालुक्यातील कोरोनाची साथ रोखण्यासाठी व बाधित रुग्णसंख्येचा आकडा कमी करण्यासाठी शासनाच्या सूचनेप्रमाणे सर्वच विभागाचे अधिकारी-कर्मचारी व जनतेच्या सहकार्यामुळे ही साथ आटोक्यात आली आणि बाधितांची संख्या कमी झाली. हे जरी बरोबर असले तरी जेव्हा रोजच्या रोज या संसर्ग रोगाने बाधित झालेल्यांची संख्या व मृत्यूचे आकडे वाढत होते तेव्हा लोक लसीकरण केंद्रावर रांगा लावून लस टोचून घेत होते. ती मिळत नसेल तर त्या ठिकाणी असलेल्या कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालीत असत. केंद्रावरील कर्मचारी जीव मुठीत धरून काम करत असत. वेळप्रसंगी त्या ठिकाणी पोलिसांना देखील पाचारण करावे लागे. अशी परिस्थिती निर्माण होत होती. अनेक उपाययोजने बरोबर झालेल्या लसीकरणामुळे बाधित रुग्णसंख्येचा आलेख कमी होऊन तो महिन्याकाठी एका अंकावर आला. नोंदीनुसार २८ ऑगस्टपासून तो निरंक आहे. लसीकरणामुळे बाधितांचा आकडा कमी होत असला तरी लस न घेतलेल्यांची संख्या काही कमी नाही परंतु हे लोक केंद्रावर जाऊन लस टोचून घेत नाहीत. त्यामुळे केंद्रावर लस घेणाऱ्याची संख्या कमी होत आहे. कारण कोरोना संपला या भ्रमात ते वावरत असावेत.
तालुक्यात लसीकरणासाठी ग्रामीण रुग्णालय नायगाव बाजार, प्राथमिक आरोग्य केंद्र बडबडा, कुंटूर, मांजरम व उपकेंद्र नर्सी, शेळगाव गौरी, मुगाव, टेंभुर्णी, होटाळा, गडगा, कोलंबी, राहेर, ईकळीमोर, सुजलेगाव, रातोळी, सांगवी, घुंगराळा, देगाव, कहाळा, कुष्णूर, सोमठाणा, रुई, अंतरगाव आदी ठिकाणी व्यवस्था केली. शहरांमध्ये वाॅर्ड वाईस फेरी मारून लसीकरण करण्याची व्यवस्था ग्रा. रु.च्या वैद्यकीय अधीक्षकांनी केली. या सर्व केंद्रावर आरोग्य विभागाने लस उपलब्ध करून दिलेली आहे. केंद्रावर मुबलक अशी लस उपलब्ध असताना देखील ते घेणाऱ्यांची संख्या मात्र कमी आहे. तालुक्यात ३६ टक्के लसीकरण झाले आहे.
यावर्षी तालुक्यातील शेतकऱ्यांनी कडधान्यातील मुगाचा पेरा १५७१ हेक्टरमध्ये केला. ज्यात नायगाव मंडळात २६४ हेक्टर, नरसी मंडळात ३०४ हेक्टर, कुंटूर मंडळात २८५ हेक्टर, बरबडा मंडळात ३९८ हेक्टर, मांजरम मंडळात ३२० हेक्टर आहे. प्रारंभी निसर्गाने साथ दिल्याने मुगाचे पीक चांगले होते परंतु जुलै आणि ऑगस्ट महिन्यात सलग २२ दिवस पाऊस झाला नसल्याने उत्पादनात घट झाली असली तरी इतर पिकात त्याची उणीव भरून निघेल या आशेवर शेतकरी असताना ६ व ७ सप्टेंबर रोजी मुसळधार पाऊस झाला. याची नोंद १२९ मि. मी.अशी झाली.या पावसामुळे इतर पिकांचे बरेच नुकसान झाले असल्याने शेतकऱ्यावर पुन्हा आर्थिक संकट ओढवले आहे.