नांदेडसह परभणी, हिंगोलीकरांनी थकविले २,३५९ कोटींची वीजबिले

By प्रसाद आर्वीकर | Published: December 15, 2022 04:06 PM2022-12-15T16:06:36+5:302022-12-15T16:09:25+5:30

तीन जिल्ह्यात एकूण ८ लाख वीजबिल थकबाकीदार आहेत

Along with Nanded, Parbhani, Hingolikars unpaid electricity bills of Rs 2,359 crore | नांदेडसह परभणी, हिंगोलीकरांनी थकविले २,३५९ कोटींची वीजबिले

नांदेडसह परभणी, हिंगोलीकरांनी थकविले २,३५९ कोटींची वीजबिले

googlenewsNext

- प्रसाद आर्वीकर
नांदेड :
नांदेडसहपरभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील सुमारे ८ लाख वीज ग्राहकांकडे महावितरणची २,३५९ कोटी १८ लाख रुपयांची थकबाकी आहे. थकबाकीचा आकडा प्रत्येक महिन्यात वाढतच असल्याने सुरळीत वीज सेवा देताना महावितरणला तारेवरची कसरत करावी लागत आहे.

घरा-घरात वापरल्या जाणाऱ्या विजेची गणना राष्ट्रीय संपत्तीमध्ये होते. महाराष्ट्र राज्य महावितरण कंपनीच्या माध्यमातून या विजेचा पुरवठा केला जातो आणि दिलेल्या विजेचे बिलही वसूल केले जाते. वसूल झालेल्या या बिलांमधून वीज वितरण विषयक सुविधा निर्माण केल्या जातात. मात्र वीजबिल थकविण्याचे प्रमाण वाढत गेल्याने थकबाकीचा डोंगर तयार झाला आहे. नांदेड, परभणी आणि हिंगोली या तीन जिल्ह्यांचे नांदेड परिमंडळ असून, या कार्यालयातून वीज सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. नियमित वीजबिल भरणाऱ्या ग्राहकांची संख्या बोटावर मोजण्याएवढीच आहे.
तीनही जिल्ह्यातील ग्राहकांचा विचार करता ७ लाख ९८ हजार ५२९ ग्राहकांकडे तब्बल २३५९ कोटी १८ लाख रुपयांची थकबाकी आहे. कृषिपंपधारकांकडे सर्वाधिक ११०६ कोटी ३१ लाख ५२ हजार रुपयांची थकबाकी आहे. ४ लाख ४४ हजार ४२४ घरगुती ग्राहकांकडे ३७७ कोटी ८१ लाख ३५ हजार, २६ हजार ८८० व्यावसायिकांकडे ९ कोटी ८८ लाख, ५ हजार ६३४ उद्योजकांकडे ४ कोटी ४ लाख रुपयांची थकबाकी आहे.

पथदिवे अन् पाणीपुरवठ्याच्या बिलाचाही नाही पत्ता
तिन्ही जिल्ह्यांमध्ये पथदिवे आणि पाणीपुरवठा योजनांकडे मोठी थकबाकी आहे. पथदिव्यांच्या वीज बिलापोटी ६३४ कोटी ४२ लाख ९१ हजार रुपये तर ३ हजार ९१७ पाणीपुरवठा योजनांकडे २१६ कोटी ८७ लाखांची थकबाकी आहे. पथदिवे आणि पाणीपुरवठा योजना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून चालविल्या जातात. महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायतींनीही या दोन्ही योजनांची बिले थकविली आहेत.

शासकीय कार्यालयेही आघाडीवर
वीजबिलांचा नियमित भरणा न करण्यात शासकीय कार्यालये देखील मागे नाहीत. तिन्ही जिल्ह्यातील शासकीय कार्यालयांमध्ये घेतलेल्या ५ हजार ६०६ वीज जोडण्यांपोटी ९ कोटी १६ लाख रुपयांची थकबाकी आहे.

कोणत्या जिल्ह्यात किती थकबाकी
हिंगोली : ४५९.८५
नांदेड : १०५४.००
परभणी : ८४५.३२
(आकडे कोटीत)

Web Title: Along with Nanded, Parbhani, Hingolikars unpaid electricity bills of Rs 2,359 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.