अपघाताग्रस्ताने चंग बांधला; टाकाऊ कॅमेरा, स्क्रीन, टॉप बसवून बाईक केली हायटेक
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2023 12:52 PM2023-03-15T12:52:47+5:302023-03-15T12:54:05+5:30
बॅक कॅमेरा, स्क्रीन, एसीची सुविधा; बाईकला केले अपघात प्रुफ
- गोविंद टेकाळे
अर्धापूर ( नांदेड ) : दुचाकीने प्रवास करताना कृषी कार्यालयातील अधीक्षक शेखर सदावर्ते यांचा ट्रकचा धक्का लागल्याने अपघात झाला. यातूनच पुन्हा असा अपघात होणार नाही यासाठी कर्मचाऱ्याने चंग बांधला अन तयार केली हायटेक बाईक. या आलिशान कारमध्ये आहे बॅक कॅमेरा, स्क्रीन, एसी आणि वरून सुरक्षित पंचक्रोशीत सध्या याच हायटेक बाईकची चर्चा असून कुतूहलाने नागरिक दुरून बाईक पाहण्यासाठी येत आहेत.
अर्धापूर तालुका कृषी कार्यालयातील शेखर केशव सदावर्ते हे कार्यालयीन अधिक्षक म्हणून कार्यरत आहेत. ते नांदेड शहरातील परिमल नगर येथे राहतात गत १४ वर्षापासून कृषी विभागात काम करत आहेत. ते आपल्या दुचाकीवरून रस्त्याने प्रवास करत असतांना एके दिवशी त्यांना एका ट्रकचा धक्का लागला. यात ते किरकोळ जखमी झाले. अपघात का होतात याची माहिती घेऊन त्यांनी पुढून आणि पाठीमागून येणाऱ्या वाहनांपासून बचाव, अपघात झाल्यास चालकाचा बचाव होईल असे, तंत्र विकसित करण्याचे ठरवले.
शेखर सदावर्ते यांनी मित्राच्या गॅरेजमधून काही टाकाऊ पार्ट जमा केले. यातून बाईकसाठी टॉप (छत) तयार केले. उन्हाळ्यात थंड हवा मिळावी यासाठी एसी फॅन बसवला. तसेच पाठीमागील वाहनांचा मागोवा घेण्यासाठी बॅक कॅमेरा व समोर स्क्रीन बसवले. मोठी साईज असलेले एंडीकेटर बसवले. यासाठी त्यांनी फायबरच्या वस्तूंचा वापर केला यामुळे दुचाकीला एखांध्या आलीशान कारचे स्वरूप आले. अपघात टाळण्यासाठी सदावर्ते यांनी केलेला हटके प्रयोग सध्या चर्चेत येत आहे.
टाकाऊतून केला हायटेक प्रयोग...
एका मित्राच्या गॅरेजवरून टाकाऊ फायबर, जुन्या वाहनांचे पार्ट आणले. गाडीचे वजन ७ किलोने वाढले असून एकूण ३० हजार रुपयांचा खर्च आला, अशी माहिती सदावर्ते यांनी दिली.