आंबेडकरी चळवळीने राजकीय गुलामी झुगारावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2018 12:26 AM2018-11-27T00:26:35+5:302018-11-27T00:30:30+5:30
कसलीही यंत्रणा हाती नसताना अन्याय-अत्याचाराविरुद्ध दलित पँथरचे कार्यकर्ते तुटून पडायचे. विद्यापीठ नामांतरासह इतर आंदोलनावेळी या चळवळीपुढे सरकारही नतमस्तक झालेले आपण पाहिले आहे. मात्र आताच्या
नांदेड : कसलीही यंत्रणा हाती नसताना अन्याय-अत्याचाराविरुद्ध दलित पँथरचे कार्यकर्ते तुटून पडायचे. विद्यापीठ नामांतरासह इतर आंदोलनावेळी या चळवळीपुढे सरकारही नतमस्तक झालेले आपण पाहिले आहे. मात्र आताच्या चळवळीत ही ताकद उरलेली नाही. हा आवाज पुन्हा बुलंद करण्यासाठी आंबेडकरी चळवळीने राजकीय गुलामी झुगारण्याची आवश्यकता असल्याचे माजी मंत्री गंगाधर गाडे यांनी सांगितले.
नामांतर लढ्यातील शहीद गौतम वाघमारे यांच्या २५ व्या स्मृतिदिनानिमित्त रिपब्लिकन पार्टी नांदेड जिल्ह्याच्या वतीने आयोजित अभिवादन सोहळ्यात ते उद्घाटक म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते सुरेश गायकवाड तर प्रमुख वक्ते म्हणून डॉ. ऋषिकेश कांबळे, डॉ. प्रतिभा अहिरे यांची उपस्थिती होती. आंबेडकरी चळवळीने या देशातील प्रतिगामी विचारसरणीचा बीमोड करुन पुरोगामी विचार पेरले. ‘नाही रे’ वर्गाला न्याय मिळवून देताना आपली स्वतंत्र प्रतिमा, प्रतिभा जपली. या चळवळीच्या बळावरच देशाचे राजकारण सुरू आहे. त्यामुळे या चळवळीच्या ताकदीची आठवण प्रत्येकाने ठेवून तिला अधिक बळकट करण्यासाठी काम करावे, असेही गंगाधर गाडे यावेळी म्हणाले.
डॉ. प्रतिभा अहिरे यांनी यावेळी ‘स्त्रियांवरील अत्याचार व वर्तमान’ या विषयावर मार्गदर्शन केले. राज्याची सध्याची परिस्थिती भयानक असल्याचे सांगत सरकारला अच्छे दिन आले. परंतु, स्त्रियांना बुरे दिवस सोसावे लागत असल्याचे त्या म्हणाल्या. ती परिस्थिती बदलण्यासाठी अन्यायकारक बदलावे लागेल, असे त्यांनी सांगितले.
प्रा. डॉ. ऋषिकेश कांबळे यांनी ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरी चळवळीची वाटचाल तथा दशा आणि दिशा’ या विषयावर मार्गदर्शन केले. चळवळीच्या मारेकऱ्यांना शोधून काढण्याची गरज व्यक्त करीत बाबासाहेबांनी उभारलेली चळवळ आपण कोणत्या दिशेने घेवून जात आहोत, याचा विचार करण्यासाठी वेळ आल्याचे ते म्हणाले. सुरेश गायकवाड यांनी अध्यक्षीय समारोप केला.
विद्यापीठाला डॉ. आंबेडकरांचे नाव मिळावे यासाठी १७ वर्षे लढा दिला. जगाच्या इतिहासात नामांतरासाठी लढला गेलेला हा सर्वाधिक मोठा लढा, मात्र त्याचाही आजच्या पिढीला विसर पडत असल्याबाबत खेद व्यक्त करीत नामांतराची अस्मिता आम्ही विसरत आहोत, ही बाब चळवळीसाठी घातक असल्याचे म्हणाले. आज पुन्हा आंबेडकरी चळवळ नेटाने पुढे घेवून जाण्याची गरज व्यक्त करत आहेत. यासाठी विचारवंतांनी योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी सांगितले.
यावेळी सूर्यकांता गाडे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक भाऊराव भदरगे तर जिल्हाध्यक्ष रुपेश बहादरगे यांनी आभार मानले. मंचावर सुखदेव चिखलीकर, शशिकांत वाघमारे, विलास सोनपारखे, सुभाष काटकांबळे, देवानंद सरोदे, सचिन कांबळे, नितीन मोरे, दिगंबर वाघासार, के.पी. शिरसाठ, प्रा. विजय सोनुले, शाहीद आनंद कीर्तने आदी उपस्थित होते़