नांदेडमध्ये १७ फेब्रुवारी रोजी आंबेडकरवादी साहित्य संमेलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2019 05:03 PM2019-02-07T17:03:40+5:302019-02-07T17:08:57+5:30
सत्यशोधक साहित्य पुरस्काराचीही घोषणा करण्यात आली़
नांदेड : नांदेडमध्ये सत्यशोधक विचार मंचच्या वतीने १७ फेब्रुवारी रोजी १८ वे आंबेडकरवादी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे़ या संमेलनाचे उद्घाटन साहित्यिक डॉ़बबन जोगदंड यांच्या हस्ते होणार आहे़ अध्यक्षस्थानी विद्रोही कवी राहुल वानखेडे राहणार आहेत़
याबाबत या संमेलनाच्या आयोजनाबाबत गुरुवारी स्वागताध्यक्ष नवनिहालसिंघ जहागीरदार, संयोजन समितीचे अध्यक्ष व्ही़पी़ढवळे, डॉ़राम वनंजे, जी़पी़मिसाळे आदींच्या उपस्थितीत पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली़ शहरातील डॉग़ंगाधर पानतावणे साहित्य नगरी (शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह) येथे होणाऱ्या या संमेलनास प्रख्यात विचारवंत डॉ़मच्छिंद्र सकटे, बौद्ध धम्माचे अभ्यासक डॉ़विमल कीर्ती, सुप्रसिद्ध कथाकार योगीराज वाघमारे, डॉ़ज्योती वाघमारे, प्रा़सुधीर अनवले, डॉ़डी़युग़वळी, डॉ़नागेश कल्याणकर आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे
संमेलनात कथाकार योगीराज वाघमारे यांना साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे़ वाघमारे यांचे कथाकथन, आरक्षण आणि आरक्षणाचा तिढा या विषयावरील परिसंवादात प्रा़डॉ़ज्योती वाघमारे विचार मांडतील़ अध्यक्षस्थानी प्रा़सुनील अनवले राहणार आहेत़ सायंकाळी भीम निळाईच्या पार हा प्रबोधनपर कार्यक्रम होणार आहे़ उस्मानाबाद येथील प्रा़राहुल देवकदम व सहकारी हा कार्यक्रम सादर करतील असे यावेळी सांगण्यात आले़
तसेच सत्यशोधक साहित्य पुरस्काराचीही घोषणा करण्यात आली़ क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या चरित्र गं्रथासाठी डॉ़ललिता शिंदे, वाताहतीची कैफियत या काव्यसंग्रहासाठी प्रा़संध्या रंगारी, डॉ़ बाबासाहेब आंबेडकरांचे तत्त्वज्ञान : आशय व विश्लेषण या ग्रंथासाठी डॉ़दत्तात्रय गायकवाड आणि नदर या कथासंग्रहासाठी अनुरत्न वाघमारे यांना सत्यशोधक साहित्य पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या पत्रकार परिषदेस अॅड़जयप्रकाश गायकवाड, माजी जि़प़सदस्य रमेश सरोदे, सत्यशोधक विचार मंचचे अध्यक्ष कोंडदेव हटकर, सचिव श्रावण नरवाडे यांची उपस्थिती होती.