खासदारकीच्या रिंगणात आता अमिता चव्हाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2018 11:57 PM2018-12-23T23:57:48+5:302018-12-24T00:09:38+5:30
विधानसभेसाठी खा. अशोक चव्हाण यांना तर नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी भोकरच्या आ.अमिता चव्हाण यांना उमेदवारी देण्यात यावी, असा एकमुखी ठराव काँग्रेस कार्यकर्त्यांनी आज बैठकीत केला.
नांदेड : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण हे पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत ही जनसामान्यांची इच्छा आहे. सामान्यांच्या इच्छेला न्याय देण्याची भूमिका काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.राहुल गांधी यांची आहे. त्यामुळे विधानसभेसाठी खा. अशोक चव्हाण यांना तर नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी भोकरच्या आ.अमिता चव्हाण यांना उमेदवारी देण्यात यावी, असा एकमुखी ठराव काँग्रेस कार्यकर्त्यांनी आज बैठकीत केला. बैठकीला चिटणीस व पक्ष निरीक्षक माजी आ. संपतकुमार यांची उपस्थिती होती.
नांदेड लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक तयारीसंदर्भात येथील प्रगती महिला मंडळाच्या सभागृहात कार्यकर्ता बैठकीचे आयोजन केले होते़ यावेळी महानगराध्यक्ष आ.अमरनाथ राजूरकर यांनी लोकसभेसाठी आ. अमिता चव्हाण तर विधानसभेसाठी खा.अशोकराव चव्हाण यांना उमेदवारी देण्यात यावी असा ठराव मांडला. त्यांनी मांडलेल्या या ठरावास उपस्थित सर्व काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकमुखी पाठिंबा दिला.
यावेळी पक्ष निरीक्षक संपतकुमार म्हणाले, नांदेडमध्ये काँग्रेस पक्षाचे चांगले काम आहे. खा.चव्हाण काँग्रेसची सत्ता आणण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत आहेत. राफेलविरुद्ध काढलेल्या काँग्रेस पक्षाच्या मोर्चामध्ये मी स्वत: सहभागी झालो होतो. खा.चव्हाण यांच्यावर नांदेड जिल्ह्याचे असलेले प्रेम काँग्रेस पक्षाला नवी ताकद आणि ऊर्जा देणारी आहे. कार्यकर्त्यांची भावना अहवालामध्ये श्रेष्ठीपर्यंत पोहोचविणार आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आता काँग्रेस पक्ष वाढीसाठी झपाटून कामाला लागले पाहिजे असेही ते म्हणाले. यावेळी आ.डी.पी.सावंत म्हणाले, राहुल गांधी सध्या अँग्री यंग मॅनच्या भूमिकेत असून त्यांच्या देहबोलीवरुन काँग्रेस कार्यकर्त्यांना प्रेरणा मिळते. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकविल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही.
माजी खा. तुकाराम रेंगे पाटील म्हणाले, नांदेड जिल्ह्यात काँग्रेस पक्षाचे काम उत्तम आहे. खा. अशोकराव चव्हाण यांच्यासारख्या सक्षम नेत्याला जिल्ह्यात अडवून ठेवू नका. महाराष्ट्रात सत्तेसाठी त्यांना राज्यभर फिरु द्या.
यावेळी आ. वसंतराव चव्हाण, माजी आ. हणमंतराव पाटील बेटमोगरेकर, माजी आ. रावसाहेब अंतापूरकर, माजी महापौर अब्दुल सत्तार, महिला काँग्रेसच्या अध्यक्षा अनुजा तेहरा, लियाकत अन्सारी यांनी भाषणे केली़