Deglur Bypoll: “भाजपचा पैसा घ्या, पण मतदान महाविकास आघाडीलाच करा”; मिटकरींचा मतदारांना वादग्रस्त सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2021 11:42 AM2021-10-28T11:42:10+5:302021-10-28T11:44:39+5:30
Deglur Bypoll: नांदेडमधील देगलूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी ३० ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे.
बिलोली: देशभरात अनेक ठिकाणी पोटनिवडणुकांचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. यातच नांदेडमधील देगलूर विधानसभेच्या जागेसाठी पोटनिवडणुका (Deglur Bypoll Election) होत आहेत. काँग्रेसचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे कोरोनाच्या संसर्गामुळे निधन झाल्यानंतर ही जागा रिक्त झाली होती. या जागेवर पोटनिवडणूक जाहीर झाल्यानंतर सर्व राजकीय पक्षांनी प्रचारासाठी कंबर कसली आहे. त्यात राष्ट्रवादी देखील मागे नाही. राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरींनी (Amol Mitkari) लक्ष्मीपूजनाचा आधार घेत मतदारांना वादग्रस्त सल्ला दिला आहे. भाजपचा पैसा घ्या, पण मतदान कांग्रेसलाच करा, असे अमोल मिटकरी यांनी म्हटले आहे.
नांदेडमधील देगलूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी ३० ऑक्टोबर रोजी मतदान होणार असून २ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर अमोल मिटकरी यांनी या ठिकाणी एक जाहीर सभेला संबोधित केले. यावेळी बोलताना अमोल मिटकरी यांनी मतदारांना वादग्रस्त सल्ला दिला.
भाजपचा पैसा घ्या, मतदान महाविकास आघाडीला करा
मतदानासाठी पैसा कोणाचाही घ्या, मात्र मतदान महाविकास आघाडीला करा. पंढरपूरमध्ये मतदारराजाकडून जी चूक घडली, माझी इथल्या मतदारांना विनंती आहे की, ही चूक घडू देऊ नका. तुमचे मत मीठ मिरची एवढे स्वस्त समजून या दलालांपुढे गहाण ठेवू नका. त्यांच्याकडे भरपूर पैसे आहेत. त्यांचे एक-एक कार्यालय ३० हजार कोटींचे आहे. आता दिवाळी आहे. आलाच पैसा तर लक्ष्मीला नाही म्हणू नका. फटाके, फराळ घ्या. भाजपाचा पैसा घ्यायचा पण महाविकास आघाडीला मतदान करायचे, असे अमोल मिटकरी यांनी म्हटले आहे.
दरम्यान, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी यापूर्वी मतदारांना अजब ऑफर दिली होती. ज्या गावात भाजपाला एकूण मतदानाच्या ७० टक्के मते मिळतील, तिथे माझ्याकडून गावजेवण घातले जाईल. तसेच ज्या प्रभागांमध्ये ७० टक्क्यांपेक्षा जास्त मतदान होईल, तेथील अध्यक्षांना विशेष बक्षीस देखील दिले जाईल, अशी घोषणा चंद्रकांत पाटील यांनी केली होती.