मायलेकींना आमदार करणारा मतदारसंघ नांदेडात; आता भोकरमध्ये पुनरावृत्तीची श्रीजयाला संधी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2024 01:14 PM2024-11-11T13:14:33+5:302024-11-11T13:16:01+5:30

नांदेड जिल्ह्यातून आतापर्यंत चार महिला उमेदवारांना विधानसभेत संधी मिळाली आहे.

Anajana Patil and Suryakanata Patil MLA Mother-Daughter from Hadgaon constituency in Nanded Dist; Now Srijaya Chavhan's chance to repeat in Bhokar | मायलेकींना आमदार करणारा मतदारसंघ नांदेडात; आता भोकरमध्ये पुनरावृत्तीची श्रीजयाला संधी

मायलेकींना आमदार करणारा मतदारसंघ नांदेडात; आता भोकरमध्ये पुनरावृत्तीची श्रीजयाला संधी

नांदेड : माजी आमदार अमिता चव्हाण यांच्यानंतर चव्हाण दाम्पत्याची मुलगी श्रीजया चव्हाण यांना आमदार बनण्याची संधी चालून आली आहे. त्यामुळे अंजनाबाई जयवंत पाटील आणि त्यांची मुलगी यांची मुलगी सूर्यकांता पाटील या मायलेकींना आमदार करणाऱ्या नांदेड जिल्ह्यात ही पुनरावृत्ती होईल का, हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे. यानिमित्ताने चव्हाण कुटुंबीयांची तिसरी पिढी निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे.

माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण, माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यांच्यानंतर त्यांची मुलगी श्रीजया यंदा चव्हाण कुटुंबीयांचा पारंपरिक असलेल्या भोकर मतदारसंघातून भाजपाकडून निवडणूक लढवत आहे. श्रीजयाचा विजय झाल्यास मायलेकींना आमदार करणारा भोकर हा नांदेड जिल्ह्यातील दुसरा मतदारसंघ ठरेल. यापूर्वी हदगाव मतदारसंघातून मायलेकींनी विधानसभेचे नेतृत्व केले होते. ‘मायलेकीला आमदार करणारा’ अशी हदगाव मतदारसंघाची यापूर्वी राज्यात ओळख होती. मायलेकींना आमदार बनवणारा बहुधा हा राज्यातील एकमेव मतदारसंघ असेल. त्याचीच पुनरावृत्ती २०२४ मध्ये होईल का? भोकर मतदारसंघातून मतदार पुन्हा मुलीला संधी देतील का? श्रीजयाचा विजय होईल का? हे निकालानंतरच स्पष्ट होईल. श्रीजयाचा विजय झाल्यास मायलेकींना आमदार करणारा भोकर हा दुसरा मतदारसंघ असेल.

नांदेड जिल्ह्यातून आतापर्यंत चार महिला उमेदवारांना विधानसभेत संधी मिळाली आहे. संयुक्त महाराष्ट्र असताना अंजनाबाई जयवंत पाटील यांनी जिल्ह्यातील पहिल्या महिला आमदार बनण्याचा बहुमान प्राप्त केला. संयुक्त महाराष्ट्रात १९५७ ते १९६२ या काळात अंजनाबाई या पहिल्या महिला आमदार बनल्या. मातब्बर नेते श्यामराव बोधनकर यांचा त्यांनी १९५७ मध्ये पराभव केला होता. श्रीजया निवडून आल्या तर महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर पाचव्या महिला आमदार म्हणून नांदेड जिल्ह्यात त्यांची ओळख असेल.

सूर्यकांता पाटील यांनी केले प्रतिनिधित्व
तब्बल १८ वर्षांनी महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर १९८० मध्ये अंजनाबाई यांची मुलगी सूर्यकांता पाटील या हदगावमधून निवडून आल्या. अत्यंत चुरशीच्या या लढतीत सूर्यकांता पाटील यांनी अवघ्या ५१७ मतांच्या फरकाने बापूराव पाटील शिंदे आष्टीकर यांचा पराभव केला.

श्रीजया पाचव्या आमदार बनतील का ?
अंजनाबाई व सूर्यकांता या मायलेकींनंतर शिवसेनेच्या अनुसया खेडकर या २००४ मध्ये नांदेड उत्तरमधून निवडून आल्या होत्या. २०१४ मध्ये भोकर विधानसभा मतदारसंघात अमिता चव्हाण यांनी माजी राज्यमंत्री माधव किन्हाळकर यांचा पराभव केला होता. यंदा भोकरमधून श्रीजया चव्हाण उभ्या आहेत.

Web Title: Anajana Patil and Suryakanata Patil MLA Mother-Daughter from Hadgaon constituency in Nanded Dist; Now Srijaya Chavhan's chance to repeat in Bhokar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.