... आणि रोजगार सेवक नियुक्तीसाठी केले ९९१ ग्रामस्थांनी मतदान, फुलवळ येथील ग्रामपंचायतीने अनोख्या पद्धतीने केली पदभरती

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2022 08:29 PM2022-08-10T20:29:28+5:302022-08-10T20:30:07+5:30

Gram Panchayat: कंधार तालुक्यातील फुलवळ येथील ग्रा.पं.मधील रोजगार सेवकाचे पद जवळपास एक वर्षापासून रिक्त होते. नव्याने हे पद भरण्यासाठी अनोखी पद्धत अवलंबण्यात आली.

... and 991 villagers voted for Rozgar Sevak appointment, | ... आणि रोजगार सेवक नियुक्तीसाठी केले ९९१ ग्रामस्थांनी मतदान, फुलवळ येथील ग्रामपंचायतीने अनोख्या पद्धतीने केली पदभरती

... आणि रोजगार सेवक नियुक्तीसाठी केले ९९१ ग्रामस्थांनी मतदान, फुलवळ येथील ग्रामपंचायतीने अनोख्या पद्धतीने केली पदभरती

Next

- मधुकर डांगे
नांदेड -  कंधार तालुक्यातील फुलवळ येथील ग्रा.पं.मधील रोजगार सेवकाचे पद जवळपास एक वर्षापासून रिक्त होते. नव्याने हे पद भरण्यासाठी अनोखी पद्धत अवलंबण्यात आली. यासाठी बुधवारी (दि. १०) विशेष ग्रामसभा घेऊन गुप्त मतदान घेण्यात आले. या आगळ्यावेगळ्या प्रक्रियेची गावासह परिसरात चर्चा रंगली आहे.

रोजगार सेवक निवडीसाठी अशी प्रक्रिया राबवणारी राज्यातील ही पहिली ग्रामपंचायत असावी. यामुळे सर्वांनाच याची उत्सुकता होती. रोजगारसेवक पदासाठी जानेवारी २०२२ मध्येच ग्रामसभेद्वारे निवड करायची होती. ९ जणांपैकी कुणाला घ्यायचे हे ठरविण्यासाठी ग्रा.पं.ने २६ जानेवारीच्या ग्रामसभेत ठराव ठेवला होता. परंतु ही निवड गुप्त मतदान प्रक्रियेद्वारे व्हावी, अशी मागणी ग्रामसभेत अनेकांनी केली होती.

गर्दीमुळे मतदान चालले उशिरापर्यंत
ग्रा.पं.ने सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत मतदान घेत दुपारी ३ वाजता निकाल जाहीर करण्याचे ठरवले होते. परंतु मतदारांच्या रांगा पाहून उपस्थित मतदारांना टोकन देऊन वेळ वाढवण्यात आली. २ ऐवजी ४ वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरू होती. ४:३० वाजता मतमोजणी सुरुवात करण्यात आली.
नोटालाही पडले एक मत

सुरुवातीस या पदासाठी एकूण नऊ जणांनी अर्ज केले होते. परंतु त्यातील पाच जणांनी अर्ज मागे घेतल्यामुळे चार उमेदवारच रिंगणात होते. एकूण ९९१ मतदानापैकी शिवहार शेंबाळे यांना ५२७ मते मिळाली, संतोष मंगनाळे यांना २००, नामदेव फुलवळे यांना १४१, संजय देवकांबळे यांना ९२ तर नोटाला १ मत मिळाले. तब्बल ३० मत बाद ठरले. या निवडणुकीत शिवहार शेंबाळे यांचा विजय झाला.

ही सर्व प्रक्रिया यशस्वी पार पाडण्यासाठी सरपंच विमलबाई मंगनाळे, ग्रामविकास अधिकारी आमृत मंगनाळे, ग्रामपंचायत कर्मचारी कैलास मंगनाळे, मनोहर जाधव, बाळू जेलेवाड यांनी परिश्रम घेतले. यावेळी मतदान केंद्रावर सहायक अधिकारी म्हणून जि. प. शाळेचे सहशिक्षक एस. पी. केंद्रे, पुराणिक, अंगणवाडी सेविका वंदना मंगनाळे, श्री बसवेश्वर विद्यालयाचे साबळे यांनी काम पाहिले. व्हिडिओ शूटिंगसाठी प्रभाकर पुरी यांनी सहकार्य केले, मतमोजणीसाठी पं. स. कंधारचे विस्तार अधिकारी कैलास रेनेवार हे उपस्थित होते. बंदोबस्तासाठी पोलीस कर्मचारी चव्हाण, होमगार्ड एस. बी. वानखेडे, एस. यू. आदमपूर यांनी परिश्रम घेतले.

Web Title: ... and 991 villagers voted for Rozgar Sevak appointment,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.