... तर शाळांची मान्यता रद्द करण्याचा प्रस्ताव शासनाकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2018 12:36 AM2018-12-24T00:36:32+5:302018-12-24T00:38:41+5:30
गोवर-रुबेला लसीकरण मोहिमेत जिल्ह्यात ५ लाख १७ हजार बालकांना लस देण्यात आली असून या मोहिमेत काही शाळांनी उत्स्फूर्त प्रतिसाद घेतला आहे तर काही शाळांनी मात्र या मोहिमेत सहभाग घेतला नसल्याची बाब पुढे आली आहे. ज्या शाळा या मोहिमेत सहभाग घेणार नाहीत
नांदेड : गोवर-रुबेला लसीकरण मोहिमेत जिल्ह्यात ५ लाख १७ हजार बालकांना लस देण्यात आली असून या मोहिमेत काही शाळांनी उत्स्फूर्त प्रतिसाद घेतला आहे तर काही शाळांनी मात्र या मोहिमेत सहभाग घेतला नसल्याची बाब पुढे आली आहे. ज्या शाळा या मोहिमेत सहभाग घेणार नाहीत, अशा शाळांची मान्यता रद्द करण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी स्पष्ट केले.
गोवर-रुबेला लसीकरण मोहिमेअंतर्गत जिल्हा टास्क फोर्स समितीची बैठक जिल्हाधिकारी डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी हा इशारा दिला. ग्रामीण आरोग्य विभाग, महापालिका विभाग, शहरी विभाग यांच्या वतीने आतापर्यंत ५ लाख १७ हजार २५८ बालकांना गोवर-रुबेलाची लस दिली आहे. या मोहिमेत काही शाळांमध्ये ९७ टक्के प्रतिसाद मिळाला तर काही शाळांमध्ये मात्र अल्प प्रतिसाद मिळाला आहे. त्याचवेळी शाळेतील शिक्षक आणि मुख्याध्यापकांचीही भूमिका निराशाजनक असल्याचेच दिसून आले. या मोहिमेत ज्या शाळा सहभागी होणार नाहीत, अशा शाळांची मान्यता रद्द करण्यात येईल. तसेच शाळेतील शिक्षक तसेच मुख्याध्यापकांवरही निलंबनाची कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
या मोहिमेविषयी अनेक शिक्षित व उच्च आर्थिक स्तरातील पालकांना ही मोहीम गोर-गरिबांसाठीच असल्याचा समज होत आहे. आमच्या मुलांना लसीकरणाची गरज नसल्याचेही सांगितले आहे. मात्र गोवर-रुबेला हे व्हायरस संपूर्ण देशातून हद्दपार करायचे असतील तर देशातील ९५ टक्के बालकांना एका विशिष्ट कालावधीत ही लस मिळणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले.
या लसीच्या दुष्परिणामाविषयी अनेक पालकांच्या मनात शंका आहेत. ताप, लस दिलेली जागा दुखणे, पुरळ येणे अशी लक्षणे दिसल्यास त्याचा ताण घेवू नये. त्यासाठी नजीकच्या आरोग्य केंद्रावर किंवा बालरोग तज्ज्ञांकडे बाळाची तपासणी करावी. उपचारासाठी तसेच कोणतीही रिअॅक्शन आल्यास आरोग्य विभागाचे पथक सज्ज असल्याचेही सांगण्यात आले.
या बैठकीस जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी. पी. कदम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. व्ही.आर. मेकाणे, डॉ. गट्टाणी, डॉ. सलिम तांबे, डॉ. विद्या झिने, डॉ. सुरेशसिंह बिसेन, शिंगणे, शिक्षणाधिकारी कुंडगिर, डॉ. लोकेश अल्लाहानी, डॉ. मोहमद घोडके आदींची प्रमुख उपस्थिती होती.
गोवर-रुबेला लसीकरण मोहिमेच्या यशस्वीतेसाठी जिल्हा प्रशासनासोबत खाजगी डॉक्टर, नांदेड इंडियन मेडिकल असोसिएशन, निमा, बालरोग तज्ज्ञ संघटना याही सरसावल्या आहेत.