अंगणवाडी जिल्हा परिषद शाळांना होणार लिंक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:18 AM2021-05-07T04:18:35+5:302021-05-07T04:18:35+5:30
एक शाळा एक अंगणवाडी किंवा एक शाळा दोन-तीन अंगणवाड्या या तत्त्वावर अंगणवाड्या शाळांना लिंक करण्याचे आदेश शालेय शिक्षण व ...
एक शाळा एक अंगणवाडी किंवा एक शाळा दोन-तीन अंगणवाड्या या तत्त्वावर अंगणवाड्या शाळांना लिंक करण्याचे आदेश शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव वंदना कृष्णा यांनी नुकतेच दिले आहेत. नांदेड जिल्हा परिषद अंतर्गत तीन हजार १० अंगणवाड्या आहेत. यातील ३३८ अंगणवाड्या आधीच शाळा इमारतीत भरत आहेत. त्यामुळे दोन हजार ६७२ अंगणवाड्या या लगतच्या शाळांना लिंक करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. शासनाच्या वतीने शाळांसाठी निधी देण्यात येतो. याचा उपयोग अप्रत्यक्षपणे अंगणवाड्यांना होणार आहे. ग्रामीण भागात अंगणवाड्यांमध्ये पालक मुलांना टाकतात. त्यानंतर मुलांना दूर असलेल्या शाळांमध्ये प्रवेश द्यावा लागतो. यामुळे अनेक पालक हे खासगी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश देतात. काही खासगी शाळांकडूनही या प्रकाराचा फायदा घेत विद्यार्थ्यांना त्यांच्याकडे वळविण्यात येते. शाळांमध्ये अंगणवाडी असल्यास पालकांना दुसरीकडे जाण्याची गरज भासणार नाही. अंगणवाडीचे शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांना पहिल्या वर्गात प्रवेश देण्यात येईल. यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांची पटसंख्या वाढविण्यासही मदत होणार आहे. अंगणवाड्या लिंक केल्याने त्यांना युडायस क्रमांक देखील मिळेल.