'आईला का मारहाण करता'; मुलाने संतापात वडिलांची दगडाने ठेचून केली निर्घृण हत्या
By श्रीनिवास भोसले | Updated: May 2, 2024 12:01 IST2024-05-02T11:59:45+5:302024-05-02T12:01:06+5:30
आईला सातत्याने मारहाण होत असल्याने राग अनावर; मुलाने वडिलांची दगडाने ठेचून केली हत्या

'आईला का मारहाण करता'; मुलाने संतापात वडिलांची दगडाने ठेचून केली निर्घृण हत्या
तामसा ( नांदेड) : 'आईला का मारहाण करता ' असे विचारत मुलाने दगडाने ठेचून आपल्या जन्मदात्याची निर्घृण हत्या केली आहे. सदर घटना हदगाव तालुक्यातील चिकाळा येथे दिनांक ३० एप्रिल रोजी रात्री ९ : ३०च्या सुमारास घडली. मधुकर मारोतराव तुपेकर ( ५५ ) असे मृत वडिलांचे नाव असून हल्लेखोर मुलगा दत्ता मधुकर तुपेकर (२३) वर्ष याला तामसा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
याबाबत थोडक्यात वृत्त असे की, चिकाळा तालुका हदगाव येथील मृत वडील मधुकर हा दिनांक ३० एप्रिल रोजी नेहमीप्रमाणे पत्नीस वाद घालत त्याने मारहाण करताना मुलगा दत्ता याने 'आईला का मारहाण करता ' असे विचारताच वडील मधुकर याने त्यालाही मारहाण केली. त्यामुळे अधिक चिडलेल्या दत्ता मधुकर तुपेकर या मुलाने रागाच्या भरात वडिलांना दगडाने डोक्यात व शरीरावर दगडाने मारून निर्घृण हत्या केली. सदर घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी डॅनियल जॉन बेन,तामसा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवराम तुगावे, श्याम नागरगोजे (पो.हे.कॉ.) आदींनी घटनास्थळी भेट दिली.
दि. १ मे रोजी तामसा प्राथमिक आरोग्य केंद्र येथे शवविच्छेदन केल्यानंतर मयताचे प्रेत नातेवाईकांकडे सोपविण्यात आले. दरम्यान दिलीप मारोतराव तुपेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तामसा पोलिसात आरोपी विरुद्ध गुरुन ३८/२०२४ भादवि कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सपोनि तूगावे करीत आहेत.