लग्नास नकार दिल्याने संताप; महिलेने मुलाच्या मदतीने प्रियकराचा केला खून, मृतदेह जाळला
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2025 19:44 IST2025-03-17T19:43:53+5:302025-03-17T19:44:22+5:30
अनैतिक संबंधातून तरुणाचा खून; गोरठा शिवारात प्रेत टाकले होते जाळून

लग्नास नकार दिल्याने संताप; महिलेने मुलाच्या मदतीने प्रियकराचा केला खून, मृतदेह जाळला
नांदेड : उमरी तालुक्यातील गोरठा शिवारात १२ मार्च रोजी एका डांबराच्या टाकीत जळालेल्या अवस्थेतील प्रेत आढळून आले होते. स्थानिक गुन्हे शाखेने या मयताची ओळख पटवून अधिक तपास केला असता अनैतिक संबंधातून माय-लेकाने या तरुणाचा खून केल्याचे पुढे आले. पोलिसांनी दोघांनाही आता अटक केली आहे.
उमरी ते मुदखेड रस्त्यावर गोरठा शिवारात १२ मार्चच्या सकाळी एका डांबराच्या टाकीत जळालेले तरुणाचे प्रेत आढळून आले होते. तरुणाच्या बोटात अंगठी होती अन् शरीर पूर्णपणे जळाले होते. या तरुणाचा खून करूनच प्रेत जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. पोलिसांना या मयताची ओळख पटविण्याचे मोठे आव्हान हाेते. पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार, अपर पोलिस अधीक्षक खंडेराव धरणे, सुरज गुरव, पोनि. उदय खंडेराय यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. अंकुश माने, पोउपनि. आनंद बिचेवार हे या प्रकरणाचा तपास करीत होते. त्यांनी घटनास्थळावरून अंगठी आणि मयताच्या जळालेल्या कपड्याचे तुकडे गोळा केले. त्यानंतर सदर भागातील अनेक सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. त्या भागात तसेच शेजारील जिल्ह्यात बेपत्ता तरुणांची माहिती घेतली. त्यात १५ मार्च रोजी मयत इसम हा अर्सजन येथील रहिवासी असल्याचे पुढे आले.
साईनाथ विठ्ठल शिंदे या ड्रायव्हरचा तो मृतदेह होता. पोलिसांनी लगेच तपासाची चक्रे फिरविली. मयताचे वडील विठ्ठल माणिकराव शिंदे यांनी या प्रकरणात उमरी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्याकडून माहिती घेऊन पोउपनि. आनंद बिचेवार यांनी सुनीता कौर रामसिंग बघेल आणि जितू रामसिंघ बघेल या दोघांना अटक केली. त्यांनी अनैतिक संबंधातूनच साईनाथ शिंदे याची हत्या केल्याची कबुली दिली. त्यानंतर दोन्ही आरोपींना उमरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
लग्नाचा लावला होता तगादा
मयत साईनाथ शिंदे याला सुनीता कौर बघेल आणि तिचा मुलगा जितू याने लग्नाचा तगादा लावला होता. या दोघांनी यापूर्वी मयत साईनाथ याला अनेकवेळा धमकीही दिली होती. त्यानंतर दोघांनी साईनाथचा खून करून प्रेत गोरठा शिवारात जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला.