माळेगाव यात्रेत आणखी एका अश्वाचा मृत्यू; पशुधन पालक चिंतेत
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2022 05:40 PM2022-12-29T17:40:45+5:302022-12-29T17:41:05+5:30
माळेगाव यात्रेत राज्याच्या वेगवेगळ्या भागांसह उत्तर प्रदेश, राजस्थान येथून घोडे आले आहेत.
- गोविंद कदम
लोहा: माळेगाव यात्रेत जवळपास १५० घोड्यावर आता पर्यंत तपासणी व उपचार झाले आहेत. घोड्याच्या दैनंदिन चारा पाणी यात बदल झाला की त्याला वेगवेगळ्या व्याधी होत असतात. दरम्यान, यात्रेत मंगळवारी आणखी एका घोड्याचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील एका बड्या नेत्यांचा हा घोडा होता त्याची अंदाजे किंमत तीन लक्ष रुपये होती असे सांगण्यात येत आहे . घोड्याच्या मृत्यूबाबत पशुधन अधिकारी डॉ. पुरी यांनी दुजोरा दिला आहे.
माळेगाव यात्रेत राज्याच्या वेगवेगळ्या भागांसह उत्तर प्रदेश, राजस्थान येथून घोडे आले आहेत. घोड्याच्या उपचार व वैद्यकीय देखभालीसाठी पशु संवर्धन विभागाची २४ तास टीम माळेगाव यात्रेत कार्यरत आहे. चार दिवसांपूर्वी यात्रेत एक अश्व दुषित पाण्यामुळे दगावला होता. त्याबद्दल मोठी ओरड सुरू आहे. दरम्यान, जिल्ह्यातील बडे प्रस्थ माजी मंत्री स्व. कुंटुरकर यांचा घोडा दरवर्षी यात्रेत येत असतो. राजेश कुंटुरकार यांची राहुटी आहे. त्यांच्या अश्वास आजार झाल्याने तज्ज्ञ पशुधन अधिकारी यांनी उपचार सुरु केले. पण अखेर मंगळवारी हा घोडा दगावला, असे पशुधन अधिकारी डॉ एम आर पुरी यांनी सांगितले. डॉ. जी. जी. हावडे (पथक प्रमुख) फो पी पी हक्के (पथक प्रमुख) पशुधन विकास अधिकारी डॉ अरविद दगडे, डॉ सतीश केंद्रे , ज्ञानेश्वर नखाडे, जकवाड , मिलिंद उखाडे, गणेश धाकतोंडे अशी टीम अहोरात्र घोड्याच्या देखरेखीसाठी आहे. जवळपास दीडशे घोड्यांवर उपचार करण्यात येत आहेत.
अश्व पालकांनी घ्यावयाची काळजी
यात्रा काळात अश्वाचा जो दैनंदिन चारा आहे यात बदल करु नये. काठेवाडी वा अन्य घोडे जे की उत्तर प्रदेश, राजस्थान तसेच इतर भागातील घोडे येतात त्याचे मालक या घोड्यांच्या चारा-,पाण्यात बदल करीत नाहीत. वाहतुकी दरम्यान काळजी घ्यावी. नियमीत जंतनाशक औषधीचा वापर करणे आवश्यक आहे. वातावरणाच्या बदलामुळे यात्रेत चारा कमी खाणे किंवा पाणी कमी किंवा न पिणे याबाबी घडल्यास पोटशुळ होउ शकते. त्यामुळे घोड्यांसाठी जो नियमीत चारा आहे तो सोबत घेवून तोच चारा देणे आवश्यक आहे. लिवर टॉनीक किंवा वाहतुक ताण कमी करण्यासाठी औषधी वापर करण्यात यावा असे पशुधन विकास अधिकारी डॉ एम आर पुरी यांनी सांगितले.