शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आणखी २८२ कोटींची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2020 06:49 PM2020-11-13T18:49:06+5:302020-11-13T18:51:09+5:30
नुकसानीपोटी शेतकऱ्यांना मदत म्हणून नांदेड जिल्ह्यासाठी २८२ कोटी ५६ लाख ६७ हजार रुपये प्राप्त झाले आहे.
नांदेड : अतिवृष्टी, पूरपरिस्थितीमुळे जिल्ह्यात ५ लाख ६४ हजार ५१९ हेक्टर क्षेत्राला फटका बसला आहे. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी शासनाकडून पहिल्या टप्प्यात २८२ कोटी ५६ लाख ६७ हजार रुपये प्राप्त झाले आहेत. जिल्ह्यातील एकूण नुकसान पाहता २८२ कोटी ५६ लाख ६९ हजार ३५० रुपयांची गरज आहे.
दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना अतिवृष्टी, पूरपरिस्थिती यामुळे झालेल्या नुकसानीपोटी मदत दिली जाईल असे शासनाने घोषित केले होते. त्यानुसार पहिल्या टप्प्यातील मदत वितरीत करण्यात आली आहे. जिल्ह्यात खरीप हंगामात जिरायत पिकांचे ५ लाख ६३ हजार ४०९ हेक्टर क्षेत्रातील, बागायत ७०० हेक्टर आणि फळ पिकांचे ४०९.४५ हेक्टर क्षेत्रातील नुकसान झाले होते. सर्वाधिक फटका हा हदगाव तालुक्याला बसला होता. हदगाव तालुक्यात ६५ हजार ६२१ हेक्टर क्षेत्रातील खरीप पिके बाधित झाली होती. त्या खालोखाल लोहा तालुक्यात ५२ हजार ३२६ हेक्टर क्षेत्रात, किनवट तालुक्यात ४८हजार ४७२, देगलूर तालुक्यात ४४ हजार ८२९, मुखेड तालुक्यात ४८ हजार ७९५ हेक्टर तसेच इतर तालुक्यात एकूण ५ लाख ६४ हजार ५१९ हेक्टर क्षेत्रातील नुकसान झाले होते.
या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना मदत म्हणून नांदेड जिल्ह्यासाठी २८२ कोटी ५६ लाख ६७ हजार रुपये प्राप्त झाले आहे. यामध्ये नांदेड तालुक्याला १० कोटी ३३ लाख ४४ हजार रुपये, अर्धापूर ८ कोटी ५१ लाख ४ हजार रुपये, कंधार २० कोटी ७६ लाख ७९ हजार रुपये, लोहा २६ कोटी ३६ लाख १७ हजार रुपये, बिलोली १६ कोटी २० लाख ८९ हजार रुपये, नायगाव १९ कोटी १९लाख ६४ हजार रुपये, देगलूर २२ कोटी ४१ लाख ४४हजार रुपये, मुखेड २४ कोटी ४० लाख ६४ हजार रुपये, भोकर १९ कोटी ५७ लाख ६७ हजार रुपये, मुदखेड ७ कोटी २९ लाख ८४ हजार रुपये, धर्माबाद १० कोटी २३ लाख ५९ हजार रुपये, उमरी १४ कोटी ३७ लाख ६७ हजार रुपये, हदगाव ३२ कोटी ८१ लाख ४ हजार रुपये, हिमायतनगर १५ कोटी ९९लाख२९हजार रुपये, किनवट २४ कोटी २३ लाख ६३ हजार रुपये आणि माहूर तालुक्याला ९ कोटी ८३ लाख ७७ हजार रुपये मदतीपोटी पहिल्या टप्प्यात मिळणार आहेत. शेतकऱ्यांच्या नजरा आता बँकेकडे लागल्या आहेत. पैसे जमा होण्याची प्रतीक्षा आहे.
१८० कोटींची मागणी वाढली
जिल्हा प्रशासनाने शेतकऱ्यांच्या नुकसानीच्या मदतीसाठी प्रचलित शासन निर्णयानुसार शासनाकडे ३८४ कोटी ८० लाख १२ हजार रुपयांची मागणी केली होती. शासनाने नुकसानीपोटी ६ हजार रुपये प्रतिहेक्टर ऐवजी १० हजार रुपये प्रतिहेक्टर मदत देण्याचा निर्णय घेतला. बागायत व फळपिकांसाठीही मदत वाढवून देण्यात आली. त्यामुळे जिल्ह्याची मागणी आता १८०कोटींनी वाढली आहे. पहिल्या टप्प्यात ५०टक्के रक्कम जिल्ह्याला प्राप्त झाली आहे. जिल्ह्याची एकूण मागणी आता ५६५कोटी १३ लाख ३६हजार ३५० रुपये इतकी झाली आहे.