नांदेडात बेपर्वाईचा आणखी एक बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2018 12:11 AM2018-02-02T00:11:34+5:302018-02-02T00:11:58+5:30
शहरात जडवाहतुकीला बंदी असताना बिनदिक्कतपणे दाखल झालेल्या एका ट्रकच्या धडकेने युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सकाळी देगलूरनाका येथे घडली. बेपर्वाईचा आणखी एक बळी या भागात गेला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : शहरात जडवाहतुकीला बंदी असताना बिनदिक्कतपणे दाखल झालेल्या एका ट्रकच्या धडकेने युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सकाळी देगलूरनाका येथे घडली. बेपर्वाईचा आणखी एक बळी या भागात गेला आहे.
जुन्या नांदेडातील देगलूरनाका हा नेहमीच वर्दळीचा भाग आहे. शहराबाहेर जाण्यासाठी आणि शहरात येण्यासाठी जुन्या पुलावरुन मोठ्या प्रमाणात वाहनांची ये-जा असते. त्यामध्ये जडवाहनांचाही समावेश आहे. गुरुवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास वाजेगाव येथील श्याम जळबा मनवर हे वाजेगावहून एम.एच.२६ बीएफ-८०५३ या क्रमांकाच्या दुचाकीवरुन बाफना टी पॉइंटकडे जात होते. त्यावेळी देगलूर नाका परिसरातील टायरबोर्डजवळ एम.एच.२६ एच-५७४५ या क्रमांकाच्या ट्रकने त्यांना धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या श्याम मनवर या तरुणाचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी देगलूरनाका भागात रास्ता रोको केला. जवळपास एक तास चाललेल्या या रास्ता रोकोमध्ये पोलिस प्रशासनाविरुद्ध तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. गेल्या अनेक वर्षापासून या भागातील जड वाहतूक बंद करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात होती. मात्र त्याकडे दूर्लक्षच होत आहे. हीच बाब संतप्त नागरिकांनी यावेळी प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला. रास्ता रोकोमध्ये युवकांसह मोठ्या प्रमाणात नागरिक सहभागी झाले होते. संतप्त नागरिकांना आवरण्यासाठी इतवारा तसेच नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी पोहचले. नागरिकांची समजूत काढून त्यांनी वाहतूक सुरळीत केली. जवळपास तासभर चाललेल्या या आंदोलनात देगलूरनाका भागातील युवकांचा सहभाग होता़
राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष शेख रऊफ जमीनदार यांनी ३० जानेवारी रोजी जिल्हाधिकाºयांना निवेदन देवून शहरामध्ये दाखल होणा-या जडवाहनांवर बंदी घालावी, अशी मागणी केली होती. देगलूरनाका येथील वाहतूककोंडीचा उल्लेख त्यांनी केला होता. मात्र त्या निवेदनाकडे दूर्लक्ष करण्यात आले.
देगलूरनाका भागात यापूर्वीही जडवाहतुकीचे अनेक बळी गेले आहेत. या भागात मोठ्या प्रमाणात ट्रकची ये-जा होते. दिवसा होणारी ये-जा रोखण्याची गरज असताना पोलिसांकडून मात्र त्याकडे जाणीवपूर्वक दूर्लक्षच केले जाते. परिणामी निष्पापांचे बळी जात आहेत. हे बळी कधी थांबणार असा प्रश्न उपस्थित होत आहे़
दरम्यान, घटनेप्रकरणी संजय जळबा मनवर यांनी दिलेल्या तक्रारीअधारे नांदेड ग्रामीण ठाण्यात आरोपी ट्रक चालक अमृत मोटरगे याच्याविरूद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे़ ट्रकचालकास पोलिसांनी अटकही केली आहे.