जडवाहतुकीचा आणखी एक बळी; शेत राखण्यास जाणाऱ्या तरुणाला अज्ञात वाहनाने चिरडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2022 13:29 IST2022-01-22T13:27:42+5:302022-01-22T13:29:29+5:30
शहरातून जाणाऱ्या जड वाहतुकीने अपघात सत्र सुरूच आहे

जडवाहतुकीचा आणखी एक बळी; शेत राखण्यास जाणाऱ्या तरुणाला अज्ञात वाहनाने चिरडले
- गोविंद टेकाळे
अर्धापूर ( नांदेड ) : शहरात जड वाहतूकीमुळे अपघाताचे सत्र सुरूच आहे. शुक्रवारी रात्री गणेश गंगाधर कल्याणकर ( २५ ) याचा नांदेड रोडवरील किसान वजन काट्याजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला. अपघातानंतर चालकाने वाहन न थांबवता तेथून पळ काढला.
फुलेनगर येथील गणेश गंगाधर कल्याणकर हा तरुण रात्री शेत राखणीसाठी बाईकवरून शेताकडे निघाला होता. नांदेड रोडवरील किसान वजन काट्याजवळ त्याच्या बाईकला अज्ञात वाहनाने पाठीमागून धडक दिली. यात गणेश गंभीर जखमी झाला.
दरम्यान, महामार्ग पोलीस पीएसआय ज्ञानेश्वर बसवंते, संदीप चटलेवार, शेख माजिद, वसंत शिनगारे यांच्या निदर्शनास अपघात आला. त्यांनी तत्काळ गंभीर जखमी गणेशला अर्धापूर येथील रुग्णालयात दाखल केले केले. यावेळी डाॅक्टरांनी तपासून त्यास मृत घोषित केले. त्याच्या पश्चात आई,वडील,दोन भाऊ असा मोठा परिवार आहे. पोलीस निरीक्षक अशोक जाधव,पोलीस उपनिरीक्षक साईनाथ सुरवशे, गुरूदास आरेवार यांनी अपघातस्थळी भेट दिली.