रॅगिंगच्या चौकशीसाठी त्रिसदस्यीय चौकशी समिती नियुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2020 07:42 PM2020-03-06T19:42:29+5:302020-03-06T19:54:03+5:30
नांदेड येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रकरण
- शिवराज बिचेवानांदेड : विष्णूपुरी येथील डॉ़ शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीयमहाविद्यालयातील वसतिगृहात वरिष्ठ विद्यार्थिनींकडून प्रथम वर्षाच्या विद्यार्थिनींची रॅगिंग करण्यात येत असल्याचा गंभीर प्रकार लोकमतने उघडकीस आणला. याचे पडसाद गुरुवारी सर्वस्तरावर उमटले. या प्रकरणाच्या चौकशीसाठी महाविद्यालय प्रशासनाने तातडीने त्रिसदस्यीय चौकशी समिती स्थापन केली. तर विधानसभेत विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाचे या प्रश्नाकडे लक्ष वेधले. अखेर सभापती नाना पटोले यांनी याबाबत माहिती घेऊन निवेदन सादर करण्यास संबंधित विभागाच्या मंत्र्यांना आदेशित केले.
मुलींच्या वसतिगृहात गेल्या चार दिवसांपासून रॅगिंगचा प्रकार सुरु आहे़ हा प्रकार लोकमतने उघडकीस आणला़ बुधवारी रात्री प्रभारी अधिष्ठाता डॉ़ एस़आऱ वाकोडे, डॉ़ गोडबोले, डॉ़ मुकुंद कुलकर्णी, वॉर्डन सुधा कानखेडकर यांनी वसतिगृहातील विद्यार्थिनींकडे विचारपूस केली होती़ रात्री सात वाजेपर्यंत ही चौकशी सुरु होती़ परंतु चौकशीसाठी जाण्यापूर्वीच सिनिअर विद्यार्थिंनींनी पुन्हा या विद्यार्थिनींना दम भरला. आमची तक्रार केल्यास बघा, पाच वर्ष आमच्या सोबतच राहायचे आहे. अशी धमकी देण्यात आली होती़ शैक्षणिक नुकसान होण्याच्या भीतिने एकाही मुलीने तक्रार दिली नाही़ गुरुवारी सकाळपासून महाविद्यालय प्रशासन तणावात होते़ त्यात संचालक डॉ़ तात्याराव लहाने यांनीही दूरध्वनीवरुन सकाळीच झाडाझडती घेतली़ प्रभारी अधिष्ठाता डॉ़ वाकोडे यांनी तात्काळ सर्व प्राध्यापकांना बोलावून बैठक घेतली़ या बैठकीत चौकशीसाठी त्रिसदस्यीय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला़ या समितीत डॉ़ इशरत करीम, डॉ़ सुधा करडखेडकर आणि डॉ़ एस़ए़ देशपांडे यांचा समावेश आहे़ चौकशीसाठी प्रथम वर्षाच्या विद्यार्थिनींना पाचारण करण्यात आले होते़ याचवेळी नांदेड ग्रामीणचे पोनि़ पंडित कच्छवे यांनीही निनावी तक्रार देण्याचे आवाहन विद्यार्थिनींना केले.
‘लोकमत’च्या वृत्ताचे विधानसभेत पडसाद
च्विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी ‘लोकमत’च्या या वृत्ताकडे विधानसभेचे लक्ष वेधले. ते म्हणाले, नांदेडच्या डॉ़ शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मुंबईतील पायल तडवीसारखे प्रकरण घडले आहे. ही गंभीर बाब असून अशा गोष्टींवर वेळीच आळा घातला नाही तर, पायल तडवीसारखी अनेक प्रकरणे होतील़ त्यामुळे शासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन याबाबतची माहिती सभागृहात सादर करुन कारवाई करावी अशी मागणी केली़ च्यावर रॅगिंगचा विषय गंभीर आहे़ त्यामुळे सरकारने हा विषय गांभीर्याने घ्यावा तसेच संबंधित विभागाच्या मंत्र्यांनी या प्रकरणाची संपूर्ण माहिती घेऊन सभागृहासमोर निवेदन करावे अशा सुचना विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिल्या़
न घाबरता तक्रारीसाठी पुढे या
बुधवारी रात्री मुलींची विचारपूस करण्यात आली; परंतु प्रथम वर्षातील मुलींनी याबाबत काहीही सांगितले नाही. अखेर या प्रकरणाच्या चौकशीसाठी त्रिसदस्यीय समिती स्थापन केली आहे. चौकशीत कुणी दोषी आढळल्यास नियमानुसार कारवाई करण्यात येईल. विद्यार्थिनींनी न घाबरता तक्रारीसाठी पुढे यावे़ फोनवर किंवा निनावी तक्रार करावी असे आवाहन प्रभारी अधिष्ठाता डॉ़ एस़आऱ वाकोडे यांनी केले.
मी जसे बोलले, तू ही तसेच बोल
महाविद्यालय परिसरात प्रथम वर्षाच्या विद्यार्थिनींची समितीकडून चौकशी सुरु असताना मी जसे बोलले,, तू ही तसेच बोल, काय झालं, हे सांगण्याच्या भानगडीत पडू नको, असा सल्ला समितीच्या चौकशीनंतर बाहेर आलेल्या एका विद्यार्थिनीने आपल्या मैत्रिणीला दिला़ यावरुन विद्यार्थिनी किती तणावात आहेत हे स्पष्ट होते़