नांदेडात ५२११ घरांना आवास योजनेतून मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2018 01:06 AM2018-11-24T01:06:04+5:302018-11-24T01:07:26+5:30

यातील ५ हजार २११ प्रस्तावांना मंजुरी मिळाली असून मार्च २०१९ पर्यंत शहरातील ६ हजार ३०५ जणांना या योजनेतून घर देण्याचे उद्दिष्ट महापालिकेने ठेवले आहे़

Approval of 5211 houses housing scheme in Nanded | नांदेडात ५२११ घरांना आवास योजनेतून मंजुरी

नांदेडात ५२११ घरांना आवास योजनेतून मंजुरी

googlenewsNext
ठळक मुद्देप्रधानमंत्री आवास योजना ४६ हजार अर्ज, २०१९ मार्चअखेरपर्यंत ६३०५ घरांचे उद्दिष्ट

विशाल सोनटक्के।
नांदेड : पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत शहरातील सर्वांसाठी घरांची संकल्पना राबविण्यात येत आहे़ या योजनेअंतर्गत शहरातून ४६ हजारांहून अधिक नागरिकांनी हक्काच्या घरासाठी अर्ज केले आहेत़ यातील ५ हजार २११ प्रस्तावांना मंजुरी मिळाली असून मार्च २०१९ पर्यंत शहरातील ६ हजार ३०५ जणांना या योजनेतून घर देण्याचे उद्दिष्ट महापालिकेने ठेवले आहे़
शासनाच्या वतीने पंतप्रधान आवास योजना हा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबविण्यात येत असून, या योजनेला शहरातून मोठा प्रतिसादही मिळत आहे़ या योजनेअंतर्गत क्लास-२ या घटकातून महानगरपालिकेकडे २ हजार ७४४ अर्ज प्राप्त झाले आहेत़ त्यातील १६२१ प्रस्तावांवर मनपाच्या वतीने सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून ११२३ प्रस्तावांच्या सर्वेक्षणाचे काम प्रगतीपथावर आहे़ घटक एएचपी-३ मधून महानगरपालिकेकडे २३ हजार २५५ अर्ज प्राप्त झाले आहेत़ यातील ११ हजार २७६ प्रस्तावांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून उर्वरित ११ हजार ९७९ सर्वेक्षणाचे काम प्रगतीपथावर आहे़ तर घटक बीएलसी-४ यातून १९ हजार ७१५ अर्ज महापालिकेकडे प्राप्त झाले आहेत़ प्राप्त झालेल्या अर्जापैकी ११ हजार ६०७ प्रस्तावांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून, ८ हजार १०८ सर्वेक्षणाचे काम प्रगतीपथावर आहे़ महानगरपालिकेने मार्च २०१९ पर्यंत ६ हजार ३०५ घरे योजनेच्या माध्यमातून देण्याचे उद्दिष्ट ठेवले असून, २०२२ पर्यंत नांदेड शहरात या योजनेतून २१ हजार १७ लोकांना हक्काचे घर देण्याचा मनपाचा प्रयत्न आहे़
प्राप्त होणाऱ्या अर्जांच्या अनुषंगाने महानगरपालिकेने शहराच्या विविध भागांत ११ डीपीआर तयार केले आहेत़ त्यातील १० डीपीआरला मंजुरी मिळाली आहे़ तर १ डीपीआर मंजुरीच्या प्रक्रियेत आहे़ मंजूर डीपीआरनुसार ३ हजार ७९१ घरकुलांची संख्या असून यातील १०३९ घरकुलांच्या बांधकामासाठी लाभार्थ्यांनी महानगरपालिकेकडे बांधकाम परवानेही मागितले आहेत़ प्रशासनाच्या वतीने कागदोपत्री प्रक्रिया पार पडल्यानंतर यातील ९१५ बांधकामांना प्रत्यक्ष परवानगी देण्यात आली असून परवानगी मिळालेल्या या घरांच्या बांधकामास सुरुवात झाली आहे़ पंतप्रधान आवास योजनेमुळे लाभार्थ्यांना अडीच लाखांपर्यंतचे अनुदान मिळत असून, बांधकाम परवानाही तातडीने दिला जात आहे़
हडकोत ९३५ तर वाघाळ्यात ८५० घरांचा प्रस्ताव
पंतप्रधान आवास योजना (नागरी) साठी मनपाच्यावतीने ११ डीपीआर तयार केले आहेत़ त्यातील १० डीपीआरला मंजुरीही मिळाली असून यासाठी ८ कोटींचा निधी प्राप्त झाला आहे़ झोन क्ऱ१ मध्ये २५० आणि ३३५ घरांचे दोन प्रकल्प़ झोन क्ऱ२ मध्ये २५० आणि ५०० अशा ७५० घरांचे दोन प्रकल्प़ झोन क्ऱ ३, ४ व ५ मध्ये ५०० घरांचा तर झोन क्ऱ६ मध्ये २५० आणि ४८६ घरांचे दोन प्रकल्प असे एकूण ३ हजार ७९१ घरांचे हे प्रस्ताव असून या प्रकल्पाची किंमत २१८७६़०७ लाख इतकी आहे़ या सर्व प्रकल्पांना मंजुरी मिळाली असून ८ कोटींचा निधीही या प्रकल्पासाठी प्राप्त झाला आहे़ दरम्यान, हडकोमध्ये ९३५ घरकुलांचा प्रकल्प प्रस्तावित असून या प्रकल्पाचा डीपीआर व नकाशा तयार करण्याचे काम सुरु आहे़ तर वाघाळा भागात ८५० घरकुलांचा प्रस्ताव असून तेथील प्रक्रियाही सुरु असल्याचे मनपाचे उपअभियंता प्रकाश कांबळे यांनी सांगितले़

Web Title: Approval of 5211 houses housing scheme in Nanded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.