नांदेड शहराच्या हरित क्षेत्र विकासाच्या कामांना मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2018 12:16 AM2018-02-08T00:16:31+5:302018-02-08T00:16:48+5:30
केंद्र शासनाच्या अमृत अभियानाअंतर्गत शहराच्या हरित क्षेत्र विकासासाठी ४ कोटी ७ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे़ बुधवारी महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत या योजनेअंतर्गत कामांच्या प्रस्तावांना हिरवा कंदील दाखविण्यात आला आहे़ यासह विषयपत्रिकेवरील सर्व सात ठराव पारित करण्यात आले आहेत़
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : केंद्र शासनाच्या अमृत अभियानाअंतर्गत शहराच्या हरित क्षेत्र विकासासाठी ४ कोटी ७ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे़ बुधवारी महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत या योजनेअंतर्गत कामांच्या प्रस्तावांना हिरवा कंदील दाखविण्यात आला आहे़ यासह विषयपत्रिकेवरील सर्व सात ठराव पारित करण्यात आले आहेत़
बुधवारी महापालिकेच्या स्थायी समितीचे सभापती शमीम अब्दुल्ला यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी बैठक घेण्यात आली़ या बैठकीत केंद्र शासनाच्या अमृत अभियानाअंतर्गत शहराच्या हरित क्षेत्र विकास प्रकल्पासाठी प्रशासनाने निविदा मागविल्या होत्या़ शहरातील विविध भागांमध्ये झाडे लावणे, त्यांचे संगोपन करणे यासह उद्यान विकासाचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे़ शहरातील नाईकनगर, बी अँड सी कॉलनी, बोंडार मलशुद्धीकरण प्रकल्प या ठिकाणी झाडे लावण्यासाठी ८९ लाख रुपयांच्या निविदेला स्थायीने मान्यता दिली़ त्याचबरोबर डंम्पिंग ग्राउंड, कॅनॉल रस्ता, व्हीआयपी रस्ता, रेल्वेस्टेशन रस्ता या ठिकाणी झाडे लावण्यासाठी १ कोटी ३८ लाख आणि विनायकनगर, टाऊन मार्केट, वात्सल्यनगर, काबरानगर, गणेशनगर , डंकीन पंपहाऊस या ठिकाणी वृक्षारोपण तसेच उद्यान विकासासाठी १ कोटी ८४ लाख रुपये अशा एकूण ४ कोटी ७ लाख रुपयांच्या कामांना स्थायीच्या बैठकीत मान्यता मिळाली आहे़ त्याचबरोबर विषयपत्रिकेवरील सात ठराव पारित करण्यात आले़ जुन्या नांदेडात विविध ठिकाणी खड्डे पडले असून हे खड्डे बुजविण्याचे आदेश सभापती शमीम अब्दुल्ला यांनी दिले आहेत़