स्मशानभूमीच्या १९१ कामांना अखेर मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2019 12:25 AM2019-03-01T00:25:31+5:302019-03-01T00:26:08+5:30
ग्रामीण भागातील स्मशानभुमीच्या दुरावस्थेचा मुद्दा मागील काही वर्षापासून ऐरणीवर आहे. अखेर लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांच्या पाठपुराव्याला यश आले आहे.
नांदेड : ग्रामीण भागातील स्मशानभुमीच्या दुरावस्थेचा मुद्दा मागील काही वर्षापासून ऐरणीवर आहे. अखेर लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांच्या पाठपुराव्याला यश आले आहे. जिल्हा वार्षिक योजनेतून जनसुविधाअंतर्गत जिल्ह्यातील १९१ स्मशानभूमीच्या कामाला प्रशासनाने मंजुरी दिली असून ही सर्व कामे लवकरच हाती घेण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे यांनी सांगितले.
ग्रामीण भागातील स्मशानभूमीचा मुद्दा सातत्याने ऐरणीवर येतो. कुठे शेड नाही तर कुठे सांगाडा नाही. कुठे स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध नाही तर काही ठिकाणी जागा उपलब्ध असूनही स्मशानभूमीच्या कामासाठी निधी मिळत नसल्याच्या जिल्ह्यातील अनेक गावांच्या तक्रारी होत्या. विविध बैठकामध्येही स्मशानभूमीच्या विकासासंदर्भात प्रश्न उपस्थित केले जात होते. विशेषत: पावसाळ्याच्या दिवसात सुविधांअभावी ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. या पार्श्वभूमीवर जिल्हा वार्षिक योजनेतून जिल्ह्यातील १९१ स्मशानभूमीच्या कामांना मिळालेली मंजुरी महत्वपूर्ण आहे.
जिल्हा परिषदेच्या वार्षिक योजना सर्वसाधारणमधून ग्रामपंचायतीला जनसुविधा पुरविणे अंतर्गत निधी देण्यात येतो. सन २०१८-१९ साठी जिल्हा परिषदेच्या निधीतून सुमारे ८ कोटी ३० लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या मधून १४० स्मशानभूमींची कामे हाती घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तर पालकमंत्र्यांच्या पुढाकारातून स्मशानभूमींच्याच कामांसाठी ५ कोटी ७५ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला असून या निधीतून ५१ स्मशानभूमीची कामे हाती घेण्यात येणार आहेत.
अशी होणार तालुकानिहाय कामे
जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) मधून सन २०१८-१९ या वर्षासाठी ग्रामपंचायतींना जनसुविधा पुरविणे अंतर्गत १९१ स्मशानभूमीच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. यात अर्धापूर तालुक्यात २०, उमरी तालुक्यात ३, कंधार तालुक्यात १८, किनवट-१९, देगलूर-१४, धर्माबाद-४, नांदेड-१८, नायगाव तालुक्यात ७, बिलोली-६, भोकर- १४, माहूर-८, मुखेड-१४, मुदखेड-६, लोहा-१४, हिमायतनगर- १० तर हदगाव तालुक्यात १६ स्मशानभूमीच्या कामांना मंजुरी मिळाली असून या कामांना लवकरच सुरुवात करण्यात येणार आहे.
ग्रामीण भागातील पदाधिकारी स्मशानभूमी विकासासाठी आग्रही होते. या अनुषंगाने १९१ स्मशानभूमीच्या कामांना प्रशासनाने मंजुरी दिली आहे. या कामासाठी साधारण १४ कोटी रुपयांचा निधीही उपलब्ध झाला आहे.
- अशोक काकडे (मुख्य कार्यकारी अधिकारी)