नांदेड मनपाच्या शेवटच्या सभेत ३ कोटींच्या कामांना मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2018 12:54 AM2018-12-02T00:54:39+5:302018-12-02T00:56:03+5:30
त्याचवेळी समितीच्या आठ सदस्यांचा कार्यकाळही संपुष्टात आला आहे. वर्षभराच्या कार्यकाळात अनेक कामे मार्गी लावल्याचे व कार्यकाळाबाबत सभापतींनी समाधान व्यक्त केले.
नांदेड : महापालिका स्थायी समितीचे सभापती शमीम अब्दुल्ला यांच्या कार्यकाळातील शेवटच्या बैठकीत ३ कोटींच्या दलित वस्ती कामांना मंजुरी देत शमीम अब्दुल्ला यांचा कार्यकाळ शनिवारी संपला. त्याचवेळी समितीच्या आठ सदस्यांचा कार्यकाळही संपुष्टात आला आहे. वर्षभराच्या कार्यकाळात अनेक कामे मार्गी लावल्याचे व कार्यकाळाबाबत सभापतींनी समाधान व्यक्त केले.
स्थायी समिती सभापती शमीम अब्दुल्ला यांच्या सभापती कार्यकाळात आठ सदस्यांच्या स्थायी समिती सदस्यत्वाच्या कार्यकाळाच्या अखेरच्या सभेत शहरातील विविध भागांतील दलित वस्ती विकास निधीतून होणाऱ्या कामांच्या मंजुरीचा विषय ठेवण्यात आला होता. जवळपास अडीच ते तीन कोटी रुपयापर्यंतच्या या निविदांना स्थायी समितीने एकमुखाने मंजुरी दिली. शहरातील प्रभाग ३ मध्ये रत्नेश्वरीनगर भागात मलवाहिनी टाकणे, रस्ते व नाली कामासाठी ३० लाख रुपये दलित वस्तीअंतर्गत देण्यात आले आहे. या कामासाठी जवळपास ११ टक्के जादा दराने श्री साई कन्स्ट्रक्शनची निविदा मंजूर करण्यात आली.
त्याचवेळी गोवर्धनघाट भागातही ५० लाखांचा दलित वस्ती निधी टाकण्यात आला आहे. नदीलगत रिटेनिंग वॉलचे बांधकाम करण्यासाठी हा निधी देण्यात आला असून अबचलनगर इन्फ्रास्ट्रक्चरला ११.५० टक्के जादा दराने ही निविदा देण्यात आली आहे. प्रभाग क्र. १९ मध्ये रस्ता, नाली कामासाठी ३३ लाखांचा निधी दलित वस्तीतून देण्यात आला आहे. हे काम ७.५ टक्के जादा दराने मोईज पठाण अहेमद खान या कंत्राटदारास देण्यात आले. प्रभाग क्र. १४ मध्ये दलित वस्तीचा २५ लाख ५४ हजार ८८२ रुपयांचा निधी रस्ता, रिटेनिंग वॉल आणि नालीसाठी देण्यात आला आहे. ही निविदाही ८.१५ टक्के जादा दराने मंजूर करण्यात आली आहे. या निविदा प्रक्रियेसही स्थागी समितीने मंजुरी दिली आहे. प्रभाग १९ मध्ये रहीमपूर भागात ३८ लाख रुपये दलित वस्तीचे प्राप्त झाले. ड्रेनेजलाईन, रस्ता, आरसीसी नालीसाठी ७.२० टक्के जादा दराची मोईज पठाण यांची निविदा स्थायीनी मंजूर केली.
प्रभाग क्र. १९ मध्येच २८ लाखांचे रस्ता, नाली, काम दलित वस्ती निधीतून होणार आहे. या कामासाठीही मोईज पठाण यांनाच पसंती देण्यात आली असून ७.६० टक्के दराने काम मंजूर करण्यात आले. स्थायी समितीने या दलित वस्ती निधीतून होणाºया सर्व कामांना मंजुरी दिली. ही कामे लवकरच सुरू होतील. निवृत्त सदस्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्याचवेळी सभापती शमीम अब्दुल्ला यांनी आपल्या वर्षभराच्या कार्यकाळात कचरा प्रश्न तसेच इतर विकासकामे मार्गी लागल्याचे सांगितले. राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडून कोणतेही अनुदान मिळत नसल्याने मनपाची विकासकामे ठप्प आहेत. अशाही परिस्थितीत विकासाचा गाडा हाकल्याचे शमीम अब्दुल्ला यांनी सांगितले. खेळीमेळीच्या वातावरणात सभा झाली. निवृत्त झालेल्या स्थायी समितीच्या आठ जागांवर ३० नोव्हेंबर रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत नव्या आठ सदस्यांची निवड केली आहे. हे आठ सदस्य आता स्थायी समितीवर जाणार आहेत. त्यामध्ये ज्योती कल्याणकर, करुणा कोकाटे, दयानंद नामदेव वाघमारे, राजेश यन्नम, पुजा पवळे, अ. रशीद, फारुख हुसेन आणि श्रीनिवास जाधव यांचा समावेश आहे.
- दरम्यान, स्थायी समिती सभापती शमीम अब्दुल्ला यांचा कार्यकाळ समाप्त झाल्याने नव्या सभापतींची निवडप्रक्रिया लवकरच होणार आहे. सभापती निवडीबाबत महापालिका प्रशासनाकडून विभागीय आयुक्तांना कळवण्यात येते. त्यानंतर विभागीय आयुक्त कार्यालयातून निवडीचा कार्यक्रम प्राप्त होतो. सोमवारी प्रशासनाचा अहवाल जाण्याची शक्यता आहे.