अर्धापूर नगरपंचायत झाली थकबाकी मुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:19 AM2021-03-23T04:19:02+5:302021-03-23T04:19:02+5:30
‘महावितरण’च्या अर्धापूर उपविभागाअंतर्गत अर्धापूर नगरपंचायतचे पाणीपुरवठा योजनेचे चालू बिलासह ११ लाख ८१ हजार ९९० रुपयांचे वीज बिल थकीत होते ...
‘महावितरण’च्या अर्धापूर उपविभागाअंतर्गत अर्धापूर नगरपंचायतचे पाणीपुरवठा योजनेचे चालू बिलासह ११ लाख ८१ हजार ९९० रुपयांचे वीज बिल थकीत होते तर पथदिव्याचे १७ लाख ३५ हजार ८२० रुपये वीज बिल थकीत होते. मार्चअखेर थकबाकी वसुलीसाठी महावितरण पत्र, सुसंवाद त्याचबरोबर सातत्याने पाठपुरावा करून थकीत वीज बिल वसुलीसाठी प्रयत्न करत आहे. नांदेड ग्रामीण विभागाचे कार्यकारी अभियंता आर. पी. चव्हाण यांनी पाठपुरावा करून अर्धापूर नगरपंचायतीकडे थकीत असलेले २९ लाख १७ हजार ८१० रुपये एकरकमी आरटीजीएसच्या माध्यमाद्वारे वसूल करण्यात यश मिळविले. थकबाकीमुक्त झाल्यामुळे अर्धापूर नगर पंचायतीचे मुख्य अधिकारी सुनील जगताप व नगराध्यक्ष लायक शेख यांचा ‘महावितरण’च्या वतीने पुष्पगुच्छ देऊन कार्यकारी अभियंता आर. पी. चव्हाण यांनी सत्कार केला. याप्रसंगी उपकार्यकारी अभियंता कादरी, सहाय्यक लेखापाल डी. डी. इंगोले व उच्चस्तर लिपिक राजकुमार सिंदगीकर उपस्थित होते. संपूर्ण थकबाकी वसूल केल्याबद्दल अर्धापूर नगरपंचायत व नांदेड ग्रामीण विभागाच्या सर्व कर्मचाऱ्यांचे नांदेड परिमंडळाचे मुख्य अभियंता दत्तात्रय पडळकर आणि अधीक्षक अभियंता संतोष वाहणे यांनी अभिनंदन केले.