अर्धापुरी केळीला बाजारात आला भाव; पण काढणीस विलंब होत असल्याने शेतकरी हवालदिल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2022 07:59 PM2022-06-16T19:59:37+5:302022-06-16T20:01:49+5:30
मागील दोन वर्षांपासून कोरोनामुळे केळीच्या दरात मोठी घसरण झाली होती.
पार्डी (जि. नांदेड) : पावसाला विलंब होत असून, केळी पिकासाठी पोषक वातावरण निर्माण होत नसल्याने केळीच्या घड काढणीस विलंब होत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे, कारण केळीला सध्या बाजारात २००० ते १८०० रुपये दर मिळत आहे; मात्र केळी काढणीस वेळ लागत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. केळीला भाव समाधानकारक; पण अर्धापूर परिसरातील केळी काढणीला वेळ असल्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना वाट पाहावी लागणार आहे.
मागील दोन वर्षांपासून कोरोनामुळे केळीच्या दरात मोठी घसरण झाली होती. कोरोनाच्या पहिल्या वर्षात केळीला कवडीमोल दर मिळाला होता, तर त्यांच्या दुसऱ्या वर्षांत केळीवर पडलेल्या रोगराईमुळे केळीचे अतोनात नुकसान झाले आहे. लाखो रुपये खर्च करून शेतकऱ्यांच्या पदरी निराशा आली होती; मात्र यंदा केळीच्या दरात सुधारणा झालेली दिसत आहे. पुढील काळातही हाच दर राहिला आणि शेतकऱ्यांचे झालेले नुकसान भरून निघेल, अशी अपेक्षा बाळगून आहे. काही शेतकऱ्यांकडील केळी काढणीस सुरुवात झाली असून, त्यांच्यात समाधान व्यक्त केले जात आहे.
शेतकऱ्यांना केळी तारणहार ठरणार का?
अर्धापूर परिसर केळीसाठी प्रसिद्ध असून, येथील केळी अनेक राज्यांत पाठविली जाते, तसेच परदेशातही अर्धापुरी केळीची चव चाखली जाते; मात्र मागील दोन वर्षांपासून केळीला कवडीमोल दर मिळाल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले होते; परंतु यंदा सुरुवातीपासून केळीला योग्य दर मिळत असल्याने समाधान व्यक्त केले जात आहे; मात्र पुढील काळातही हाच दर स्थिर राहतो की नाही पुढील काळात कळेल; परंतु सध्याच्या परिस्थितीत केळीला चांगला दर मिळत असल्याने केळी उत्पादकासाठी अपेक्षा वाढल्या आहेत. मागील वर्षांत झालेले नुकसान भरून निघेल आणि शेतकऱ्यांची आर्थिक घडी बसेल, अशी अपेक्षा आहे.