नांदेडमध्ये रबीचे क्षेत्र दुपटीने वाढणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2019 06:06 PM2019-11-16T18:06:22+5:302019-11-16T18:16:11+5:30
२ हजार ३५ हेक्टरवर गहू, हरभरा आणि ज्वारीची पेरणी
- श्रीनिवास भोसले
नांदेड : परतीचा पाऊस जोरदार झाल्याने सर्व नदी-नाल्यांसह विहिरींना पाणी आले असून जमिनीतील पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे़ त्यामुळे यंदा रबीच्या पेरणीक्षेत्रात दुपटीने वाढ होईल, असा विश्वास कृषी विभागाने व्यक्त केला.आजपर्यंत जिल्ह्यात २ हजार ३५ हेक्टरवर पेरणी झाली आहे़
नांदेड जिल्ह्यामध्ये परतीच्या पावसासह आॅक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अतिवृष्टी झाली़ परिणामी, ऐन पावसाळ्यात ज्या विहिरींना पाणी आले नाही त्या विहिरी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात भरल्या आहेत़ सर्वच विहिरी आजघडीला तुडुंब भरलेल्या आहेत़ त्यामुळे हळद व इतर पिकांना पाणी कमी लागेल़ परिणामी, गहू, हरभरा आणि रबीत इतर पिकांना आवश्यकतेनुसार पाणीपाळ्या मिळू शकतात़ त्यामुळे यंदा रबीमध्ये हरभरा आणि गव्हाचे पेरणीक्षेत्र वाढण्याची शक्यता आहे़ आजघडीला रबीच्या पेरण्यांना प्रारंभ झाला आहे़ नांदेड जिल्ह्यात ९० हेक्टरवर ज्वारी तर २५० हेक्टरवर हरभऱ्याची पेरणी झाली आहे़ त्यापाठोपाठ मुदखेडमध्ये १० हेक्टर गहू, २५ हेक्टर हरभरा, नायगाव - २० हेक्टर ज्वारी, ८० हेक्टर हरभरा, बिलोली तालुका - ३० हेक्टर ज्वारी, ३५० हेक्टर हरभरा, धर्माबाद - १० हेक्टर ज्वारी, ४०० हेक्टर हरभरा पिकाची पेरणी झाली आहे़ नांदेड जिल्ह्यात आजपर्यंत दोन हजार ३५ हेक्टरवर पेरणी झाल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने कळविण्यात आले आहे़
रबीचे तालुकानिहाय सर्वसाधारण क्षेत्र आणि कंसामध्ये प्रस्तावित क्षेत्र हेक्टरमध्ये
नांदेड जिल्ह्यातील नांदेड तालुक्यात रबीचे सर्वसाधारण क्षेत्र १८ हजार ५१२ हेक्टर असून यंदा २५ हजार ४९६ हेक्टर प्रस्तावित आहे़ अर्धापूर - ५ हजार ५७२ (१९ हजार ५३४), मुदखेड - ५ हजार ७२० (७०००), लोहा - ५ हजार १२१ (७ हजार ४४४), कंधार - ७ हजार ४६५ (२४ हजार ७१८), देगलूर - १० हजार १८८ (२९ हजार १२६), मुखेड - १० हजार ६८९ (२५ हजार ७३१), नायगाव - १२ हजार ४८५ (२३ हजार ७२८), बिलोली -१२ हजार ७५२ (२६ हजार ३२६), धर्माबाद - ४ हजार ७५२ (१७ हजार ५००), किनवट - ५ हजार ३८४ (२३ हजार ५००), माहूर - ३ हजार ६३० (१० हजार ५२४), हदगाव - १३ हजार ६५६ (२८ हजार), हिमायतनगर - १० हजार ५६२(११ हजार ९६२), भोकर - ५ हजार ९३१ (१० हजार) तर उमरी तालुक्यात ४ हजार २९३ सर्वसाधारण क्षेत्र असून प्रस्तावित क्षेत्र ९ हजार ४५० हेक्टर आहे़ जिल्ह्यात एकूण १ लाख ३६ हजार ७१२ हेक्टर रबीचे सर्वसाधारण क्षेत्र असून यंदा ३ लाख ४९ हेक्टरवर रबीची पेरणी प्रस्तावित आहे़ सदर पेरणीमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही़
प्रकल्पांतील पाणीसाठ्याने शेतकरी आनंदी
नांदेड जिल्ह्यातील बहुतांश गावांना येलदरी आणि इसापूर धरणाचे पाणी मिळते़ सदर प्रकल्पांमुळे नांदेड जिल्ह्यातील हजारो हेक्टर जमीन सिंचनाखाली आली आहे़ मागील काही वर्षांत दोन्ही प्रकल्प कोरडेठाक राहिल्याने शेतकऱ्यांना केळी, ऊस आदी पिके काढून काढून टाकावी लागली होती; परंतु परतीच्या पावसाने दोन्ही प्रकल्पात मोठा जलसाठा उपलब्ध झाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे़ विष्णुपुरी आणि येलदरी प्रकल्प शंभर टक्के भरला आहे तर ऊर्ध्व पैनगंगा इसापूर प्रकल्प ७५ टक्के भरला आहे़ त्यामुळे यंदा सिंचनासाठी मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध होणार आहे़