प्रार्थनेला विरोध केल्याने दोन गटांत वाद; पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला
By सुमित डोळे | Published: February 12, 2024 12:28 PM2024-02-12T12:28:16+5:302024-02-12T12:28:33+5:30
सिटी चौक ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे
छत्रपती संभाजीनगर : एका धार्मिक स्थळात प्रार्थनेचा आवाज कमी करण्यास सांगण्यावरून दोन गटांत वाद होऊन तणाव निर्माण झाला. लेबर कॉलनीत रविवारी सायंकाळी ही घटना घडली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सिटी चाैक पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप केल्याने पुढील मोठा वाद टळला.
स्थानिक सूत्रांच्या माहितीनुसार, लेबर कॉलनीतील मोकळ्या मैदानाजवळ एका धार्मिक स्थळ आहे. सायंकाळी तेथे स्थानिक तरुण नियमित प्रार्थनेसाठी एकत्र आले. त्याचदरम्यान काही अंतरावरील एका धार्मिक स्थळातदेखील प्रार्थना होत असताना एका इसमाने मैदानाजवळील धार्मिक स्थळामध्ये जात प्रार्थनेचा आवाज कमी करण्यास सांगितले. शिवाय दरवाजावर लाथा मारल्या. तरुणांनी त्याची समजूत घातली. ही प्रार्थना रोज कमी आवाजातच ७ वाजता नियमितपणे होते, असे समजावून सांगितले.
मात्र, सदर इसमाने फोन करून इतरांना बोलवण्याचा प्रयत्न केला. तरुणांनी त्याचे मोबाइलमध्ये चित्रण करून सिटी चौक पोलिसांना घटनेची माहिती दिली. निरीक्षक निर्मला परदेशी, उपनिरीक्षक निवृत्ती गायके यांनी घटनास्थळी तत्काळ धाव घेतली. तरुणांना ठाण्यात जाण्यास सांगण्यात आले. त्यानंतर प्रार्थनेला विरोध करणाऱ्या इसमाला ताब्यात घेतले. रात्री उशिरा सिटी चौक पोलिस ठाण्यात सय्यद नासेर सय्यद हसन (५२, रा. लेबर कॉलनी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. उपनिरीक्षक निवृत्ती गायके तपास करत आहेत.