पोलिसांची गाडी दारात असताना डॉक्टरच्या घरात सशस्त्र दरोडा; हदगावमधील खळबळजनक घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2022 03:58 PM2022-07-17T15:58:41+5:302022-07-17T15:58:49+5:30

डॉक्टरांसह कुटुंबातील सदस्यांना बेदम मारहाण, लहान बाळाला उचलून नेण्याची धमकी, ५० तोळे सोने लंपास

Armed robbery at doctor's house in Hadgaon, Nanded district | पोलिसांची गाडी दारात असताना डॉक्टरच्या घरात सशस्त्र दरोडा; हदगावमधील खळबळजनक घटना

पोलिसांची गाडी दारात असताना डॉक्टरच्या घरात सशस्त्र दरोडा; हदगावमधील खळबळजनक घटना

googlenewsNext

हदगाव/ मनाठा : हदगाव शहरातील महात्मा बसवेश्वर चौकात डॉक्टरांच्या घरी काल (दि.१६) रोजी रात्री धाडसी चोरी झाली. हातपाय बांधून बेदम मारहाण करीत चाकू गळ्याला लावला. याचबरोबर सहा महिन्यांच्या बाळाला उचलून नेण्याची धमकी देऊन घरातील ५० तोळे सोन्याचे दागिने लंपास केले. ही घटना घडत असताना पोलिसांची गाडी दारात होती अन् चोर घरात असताना कोणालाही ओरड करता आली नाही.

हदगाचे त्वचारोग तज्ज्ञ डॉ. पवन शेट्टी (३१)यांचे घर जुन्या शहरात आहे. १६ जुलै रोजी मध्यरात्री २.३० वाजता चोर मागच्या दाराने आत शिरले व बाहेर ओसरीत डॉक्टरांचे आई-वडील प्रमोद शेट्टी (५८) व प्रतिभा शेट्टी झोपले होते. त्यांना उठवून चोरांनी दागिने, पैसे कुठे आहेत याची विचारपूस केली; पण प्रतिभाबाईने सांगण्यास विरोध केल्याने त्यांना मारझोड केली. त्यानंतर डॉक्टरच्या खोलीत प्रवेश केला. त्यांच्या सहा महिन्यांच्या बाळाला सोबत घेऊन जाऊ, अशी धमकी दिल्याने त्यांनी कुठे काय आहे ते सांगितले. यावेळी पोलिसांची गाडी पेट्रोलिंगसाठी दारात उभी होती, पण बांधून सगळ्यांच्या मानेवर चाकू असल्यामुळे कोणालाही ओरडता येत नव्हते. हा खेळ पाऊण तास चालला.

याच घरात ३० वर्षांपूर्वी झाली होती चोरी
यापूर्वी ३० वर्षांपूर्वी याच घरात अशीच मोठी चोरी झाली होती, अशी आठवण आजोबा यादव आप्पा यांनी सांगितली. ते चोर सालदार गडीच निघाले होते. या घटनेने शहरात भीती पसरली आहे. दरम्यान, सोन्याच्या बांगड्या, मणी मंगळसूत्रासह तिजोरीमधील सोन्याचे बिस्कीट असे ५० तोळे सोने व दीड लाख रोख रक्कम लंपास केली आहे. चोरांनी त्यांच्या अंगावरील कपडे घटनास्थळी टाकून डॉक्टरांचे कपडे घालून पोबारा केला.

मोटारसायकलवर आले चोरटे
चोरी करण्यासाठी आणलेल्या मोटरसायकल अण्णाभाऊ साठे चौकात उभ्या करून ठेवल्या होत्या. तेथील नवयुवकांनी सदर माहिती पोलिसांना दिली व त्यांच्या स्वाधीन दोन मोटरसायकली केल्या; मात्र पळून जाताना परत हदगाव येथील बालाजी व्यास यांची मोटरसायकल चोरी करून ती मोटरसायकल कोथळा शिवारात कॅनॉलसाईडवर फेकून दिल्याचे आढळले. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी हजर झाले. पुढील तपासासाठी नांदेड येथील श्वानपथकासह एलसीबीचे अधिकारी तथा हदगाव येथील पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड प्रयत्नशील आहेत.

Web Title: Armed robbery at doctor's house in Hadgaon, Nanded district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.